ऐन दिवाळीत शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद लाभला असून, कराड तालुक्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यात महामार्गावरील वाठार, पाचवड फाटा, मालखेडसह ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळण्यासह केलेल्या दगडफेक व तोडफोडीत ३ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १० पोलीस कर्मचारी किरकोळ व गंभीर जखमी झाले. तर ४ पोलीस वाहनांसह ७० ते ८० वाहनांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांच्या लाठीचारात २०हून अधिक शेतकरी व शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महामार्गासह अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाल्याने ऐन दिवाळीत लोकांचे अतोनात हाल, तर शीघ्र कृती दलाच्या साहाय्याने सायंकाळी वातावरण निवळल्याचे चित्र होते.
दरम्यान, दिवाळी सणानिमित्त दरवर्षांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड मुक्कामी आले आहेत. या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासन कमालीचे सतर्क असून, शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून समोर आलेल्या अनपेक्षित आक्रमकतेमुळे पोलिसांची दिवाळी रस्त्यावरच साजरी होणार आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराड नजीकच्या वाठार येथे खऱ्या अर्थाने आंदोलनाला हिंसक वळण लागले. याचबरोबर कराड तालुक्यातील मालखेड, पाचवड फाटा, शेणोली स्टेशन आदी ठिकाणीही शेतकऱ्यांनी आक्रमक भावना व्यक्त केल्या. जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूकही रोखण्यात आल्याचे तसेच फलटण तालुक्यातील सांगवी येथे पोलीस व शेतकरी कार्यकर्त्यांत झालेल्या बाचाबाचीनंतर सौम्य लाठीचार झाल्याचे समजते. कराड तालुक्यातील वाठारसह महत्त्वाच्या मार्गावर झालेल्या आंदोलनाने जरी पोलिसांचे व लोकांचे मोठे हाल झाले असले तरी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना अन्यायाने पेटून उठल्याचे जाणवते आहे. महामार्गावरील वाठार, मालखेड व पाचवड फाटय़ाजवळ दुपारी झालेल्या धुमश्चक्रीत कराड तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार रवींद्र तेलतुंबडे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सुर्वे, मुरलीधर मुळूक, चालक सचिन देशमुख, राजेंद्र बोडरे यांच्यासह सुमारे १० पोलीस कर्मचारी किरकोळ व गंभीर जखमी झाले. तर पोलिसांच्या प्रतिहल्ल्यात शेतकरी व संघटनांचे सुमारे २०हून अधिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
आंदोलकांकडून झालेल्या दगडफेक व तोडफोडीमध्ये पोलिसांच्या ३ जीप व एका मोठय़ा पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले, तर महाराष्ट्र व कर्नाटक परिवहन मंडळाच्या एसटी गाडय़ांसह खासगी वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड मोहीम हाती घेतली असून, दक्षता म्हणून आंदोलनापूर्वीच पंजाबराव पाटील-टाळगावकर, राजेंद्र मोहिते यांच्यासह काही कार्यकर्त्यांना कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे. आज दिवसभरातील आंदोलनादरम्यान घडलेल्या अनुचित घटनांचे गुन्हे नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते. आंदोलनाची तीव्रता गांभीर्याने घेऊन पोलिसांनी कराड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आंदोलकांची धरपकड सुरू केली असल्याचेही वृत्त आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान
परिसराला सुरक्षा कडे
दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिवाळीनिमित्त कराड दौऱ्यावर आले असून, ते येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत. अशातच यापूर्वीच शेतकरी संघटनांनी चव्हाण यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा चंग बांधला असल्याने या परिसराभोवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणारे सर्व रस्ते जाम करण्यात आले आहेत. पाटण कॉलनीच्या प्रत्येक रस्त्यावर अडथळे उभारून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काटेकोरपणे विचारपूस केल्याखेरीज कॉलनी परिसरात कोणालाही सोडण्यात येत नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यास हितच्िंातकांची झुंबड उठणार असल्याने पोलीस बंदोबस्ताचा कस लागणार आहे.
सातारा जिल्हय़ातही आंदोलनाचे लोण
ऐन दिवाळीत शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी छेडलेल्या आंदोलनाला आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद लाभला असून, कराड तालुक्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
First published on: 13-11-2012 at 02:22 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andolan is also in satara disrect