० दारणा, गोदावरी, मूळा व प्रवरा नदीच्या काठांवर जमावबंदी
० कोल्हापूर पद्धतीचे काही बंधारे संवेदनशील म्हणून जाहीर
० बंधारे व धरणांवर कडेकोट बंदोबस्त
० पाणी चोरी रोखण्यासाठी गस्ती पथक
० नदीकाठावरील गावांचा वीज पुरवठा खंडित होणार
दारणा, गोदावरी, मूळा व प्रवरा नदीच्या काठांवर जमावबंदी..स्थानिक विरोध लक्षात घेऊन कोल्हापूर पद्धतीचे काही बंधारे संवेदनशील म्हणून जाहीर..सर्व बंधाऱ्यांवर चोख पोलीस बंदोबस्त.. गस्तीसाठी खास पथक..समन्वयासाठी प्रत्येक धरणावर विशेष कक्ष व बिनतारी यंत्रणा..नदीपात्रातील पाणी चोरी टाळण्यासाठी काठावरील सर्व गावांमध्ये वीज पुरवठा खंडित..
ही सर्व तयारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून सोडले जाणारे पाणी मराठवाडय़ात निर्धोकपणे पोहचावे, यासाठीची. नाशिक-अहमदनगरमार्गे औरंगाबादला जाणाऱ्या या पाण्याचा तब्बल १९५ ते २३० किलोमीटरचा प्रवास अशा कडेकोट व्यवस्थेत होणार आहे.
स्थानिक पातळीवरून होणारा तीव्र विरोध लक्षात घेऊन पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासन, पोलीस व महावितरण कंपनी कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे या तयारीवरून दिसत आहे. औरंगाबादच्या जायकवाडी धरणात पाणी दाखल होईपर्यंत म्हणजे पुढील जवळपास दहा दिवस ही विशेष व्यवस्था राहणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मूळा धरणातून बुधवारी तर गुरूवारी याच जिल्ह्यातील भंडारदरा व नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून प्रत्येकी तीन टीएमसी असे एकूण नऊ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील विरोधाच्या पाश्र्वभूमीवर, प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. कमीतकमी नुकसान होऊन जायकवाडीपर्यंत पाणी पोहचावे, यासाठी उध्र्व बाजूकडील धरणांची प्रामुख्याने यावेळी निवड करण्यात आली. यापूर्वी भंडारदरा-निळवंडे धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडताना केलेल्या एकंदर नियोजनाचा अनुभव प्रशासनाच्या कामी आला आहे. दारणा धरणातून पाच दिवस, भंडारदरा सहा ते सात दिवस आणि मूळा धरणातून किमान तीन दिवस पाणी सोडावे लागणार आहे. मूळा व भंडारदरा नदीचे पात्र सध्या पूर्णपणे कोरडे असल्याने हे पात्र पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मजल-दरमजल करत ते जायकवाडीकडे जाईल. वाळू उपशामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या खड्डय़ांचा पाणी पुढे जाण्यास प्रामुख्याने अडथळा आहे.
पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठावरील दोन्ही बाजूला जमावबंदी लागू केली जाणार आहे. या परिसरात जमावाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवाय दारणा, गोदावरी, मूळा व प्रवरा नदीपात्रात सुमारे २६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यातील काही बंधाऱ्यांच्या ठिकाणी स्थानिकांकडून अडथळे होण्याची शक्यता असल्याने ते बंधारे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांवर शस्त्रधारी पोलिसांचा तसेच इतर सर्व बंधाऱ्यांवरही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनातील समन्वयासाठी बिनतारी संपर्क यंत्रणेचा वापर केला जाईल. नदीपात्रातील पाणी चोरी रोखण्यासाठी या संपूर्ण काळात परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नदीकाठी या काळात गस्ती पथकही कार्यान्वित केले जाणार आहेत. या शिवाय, सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी दारणा, मूळा, भंडारदरा व जायकवाडी धरणांवर खास कक्ष स्थापना करण्यात आले आहेत.
पाणी पुढे जाताना ठिकठिकाणी त्याचे मापन केले जाणार आहे. पाटबंधारे विभागाने ही व्यवस्था केली आहे. नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाचे संपूर्ण राज्यात सरिता मापन केंद्र आहेत. त्यांचाही उपयोग समांतर मापनासाठी केला जाणार आहे.
त्या’ बंधाऱ्यांमधील साठा ‘जैसे थे’ ठेवणार
जायकवाडीसाठी सोडले जाणारे पाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविले जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत असली तरी हे पाणी सोडण्यापूर्वी त्या बंधाऱ्यांमध्ये शिल्लक असलेला साठा पुन्हा ‘जैसे थे’ करून दिला जाणार आहे. दारणा, गोदावरी, प्रवरा व मूळा नदीपात्रात २६ पेक्षा अधिक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यात काही अंशी जलसाठा असला तरी जायकवाडीसाठी पाणी सोडताना त्या पाण्याचे नुकसान सहन करावे लागते की काय, अशी धास्ती स्थानिकांमध्ये होती. परंतु, हे पाणी पुन्हा उपलब्ध करून दिले जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याकरिता या विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या बंधाऱ्यांमध्ये सध्या किती पाणी शिल्लक आहे, याचे मोजमापही केले आहे.
पाण्याच्या संरक्षणासाठी ‘आणीबाणी’
० दारणा, गोदावरी, मूळा व प्रवरा नदीच्या काठांवर जमावबंदी ० कोल्हापूर पद्धतीचे काही बंधारे संवेदनशील म्हणून जाहीर ० बंधारे व धरणांवर कडेकोट बंदोबस्त ० पाणी चोरी रोखण्यासाठी गस्ती पथक ० नदीकाठावरील गावांचा वीज पुरवठा खंडित होणार दारणा, गोदावरी, मूळा व प्रवरा नदीच्या काठांवर जमावबंदी..
First published on: 28-11-2012 at 02:01 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anibani for saveing the water