वाहनचालकांचे जीव धोक्यात
मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली असली तरी रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांची संख्या कमी झालेली नाही. जनावरे पकडण्यासाठी गेलेल्या पथकांवर हल्ले होत असल्याने कर्मचारीही यापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेत आणि नगरसेवकांकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने गेल्या दहा दिवसांपासून जनावरे पकडण्याची कारवाई सुरू केली. त्यासाठी प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली मात्र सकाळी, सायंकाळी रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरांचा ठिय्या वाहनचालकांच्या जीवावर बेतू लागला आहे. बडकस चौक ते अयाचित मंदिर या मार्गावर एक महाविद्यालयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी मोकाट जनावर आडवे आल्याने आडवातिडवा पडून गंभीर जखमी झाला.
जनावरांचे मालक सकाळच्यावेळी गायी-म्हशी-सांड मोकळे सोडून देतात. त्यांना पकडण्यासाठी येणाऱ्या महापालिकेच्या पथकांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत या पशुमालकांची मजल गेली आहे. शहरातील विविध भागाची पाहणी केली असता छोटा ताजबाग ते तुकडोजी महाराज पुतळा, संत जगनाडे चौक ते भांडे प्लॉट चौक, तुकडोजी पुतळा ते लोहमार्ग पोलीस मुख्यालय, टी.बी. वार्ड चौक ते मेडिकल चौक, भांडे प्लॉट ते छोटा ताजबाग, महाकाळकार बिल्डिंग ते सक्करदा पोस्ट ऑफिस, कमाल चौक ते वैशालीनगर, अशोक चौक शिवाजी पुतळा, आयुर्वेदिक कॉलेज ते क्रीडा चौक, सी.पी. अँड बेरार महाविद्यालय ते क्रीडा चौक, मनोरुग्णालय चौक ते मानकापूर चौक या मार्गावर गायींचा कळप नेहमीच ठाण मांडत असतो. ‘ट्रॅक्टर’ घेऊन कर्मचारी निघतात मात्र, त्यांना जनावरे सापडत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे या अगदी किरकोळ वाटणाऱ्या पण गंभीर समस्येपासून सुटका काही होत नाही.
पावसाळ्याच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात मोकाट गायी रस्त्यांवर येण्यास अनेक मतप्रवाह आहे. काहींच्या मते गायींच्या गोठय़ात पावसाळ्यात चिखल आणि माश्यांचा त्रास होत असल्याने गायी रस्त्यावर ठाण मांडतात. पावसाळ्यात जागोगावी हिरवा चारा सर्वत्र उपलब्ध असल्याने मालक जाणिवपूर्वक गायींना मोकाट सोडतात. आठवडी बाजार, भाजीपाला, फुल बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. परंतु, कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा बंदोबस्त करता आलेला नाही. याचे परिणाम वाहनचालकांना भोगावे लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा