भारतात जंगलांमध्ये वाघांचे दर्शन दुर्मिळ झाले असताना आता जंगलात अ‍ॅनिमेटेड वाघ फिरणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या वनखात्याची वगैरे नसून मराठीतील एका चित्रपटाच्या निमित्ताने हा अ‍ॅनिमेटेड वाघ तयार करण्यात आला आहे. ‘हिंमतवाला’मध्ये अजय देवगणने अ‍ॅनिमेटेड वाघाशी दोन हात केल्याची घटना ताजी असताना आता ‘वेलकम टू जंगल’ या मराठीतील पहिल्यावहिल्या ‘सायन्स फिक्शन’ चित्रपटात नायक आणि नायिका अ‍ॅनिमेटेड वाघाशी सामना करणार आहेत. हा वाघ तयार करण्यासाठी कोल्हापूरच्या ‘रॉयल ९ डिझाइन’ या कंपनीतील २२ तंत्रज्ञांची टीम तब्बल तीन महिने काम करत होती.
मराठी चित्रपटांमध्ये प्राण्यांचा वापर खूप कमीच करण्यात येतो. त्यातच ‘पेटा’सारख्या संघटनांमुळेही निर्माते खऱ्याखुऱ्या प्राण्यांना मोठय़ा पडद्यावर दाखवताना कचरतात. त्यामुळे ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटात वाघ दाखवताना तो अ‍ॅनिमेटेडच असावा, असा निर्मात्यांचा आग्रह होता. त्याप्रमाणे आम्ही हा वाघ तयार करण्यासाठी मेहेनत घेतली, असे ‘रॉयल ९ डिझाइन’च्या सतीश जांबे यांनी सांगितले. चित्रपटात इतर ‘व्हीएफएक्स’चा समावेश आहेच. पण खास हा वाघ बनवण्यासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटा सुरुवातीस नायिका जंगलात फिरत असताना तिच्यासमोर वाघ येतो. नायक मग टारझनप्रमाणे साहस दाखवून वाघाच्या तावडीत सापडलेल्या नायिकेला सोडवतो. या पाच ते सात मिनिटांच्या प्रसंगासाठी हा वाघ तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पावसाळ्यात करण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक प्रकाशात वाघ कसा दिसेल, याचा विचार करून हा वाघ तयार केला, असे जांबे यांनी सांगितले.

कसा बनला वाघ?
वाघ तयार करण्याआधी चित्रिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर रेखाचित्रे काढण्यात आली. रेखाचित्रांच्या आधारे चित्रिकरण झाल्यानंतर मग ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञांची टीम कामाला लागली. सर्वात आधी वाघाचा सांगाडा तयार करण्यात आला. त्यानंतर त्या वाघावर कातडी कशी चढवण्यात येईल, त्या कातडीचा स्पर्श कसा असेल, यावर खास तंत्रज्ञाने काम केले. वाघाचे डोळे, नखे वगैरे गोष्टींसाठीही वेगवेगळ्या तंत्रज्ञांनी काम केले. वाघ पूर्ण तयार झाल्यानंतर मग त्याला अ‍ॅनिमेशनमध्ये हालचाली देण्यात आल्या. आधीच चित्रित केलेल्या प्रसंगात त्या वाघाला टाकताना त्याच्या हालचाली, त्याचा आकार याबाबत खूप काटेकोरपणे काम करावे लागले.