भारतातील आघाडीचे ज्येष्ठ तबलावादक पं. आनिंदो चटर्जी यांच्या सोलो तबलावादनाचा आनंद लुटण्याची संधी रसिकांसाठी चालून आली आहे. ‘सूरश्री’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमात आनिंदो चटर्जी व शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती सहभागी होणार आहेत. शनिवार, १९ जानेवारी या दिवशी रात्री साडेआठ वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात हा कार्यक्रम होणार असून तो ‘लोकसत्ता’तर्फे प्रस्तुत होत आहे.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून तबलावादनाचे धडे गिरविणाऱ्या आनिंदो यांचे नाव या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी प्रथम उस्ताद अफाक हुसेन खाँ आणि त्यानंतर पंडित ग्यानप्रकाश घोष यांच्याकडे तब्बल तीस वर्षे शागिर्दी केली. तबलावादनातील कौशल्यामुळे त्यांना १९९०मध्ये हाऊस ऑफ कॉमन्स येथे तबला वाजविण्याची संधी मिळाली. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तबलावादन करणारे ते पहिले कलाकार ठरले. पं. निखील बॅनर्जी (सतार), पं. बुद्धदेव दासगुप्ता (सरोद), उस्ताद अली अकबर खाँ (सरोद), उस्ताद रईस खाँ (सतार), गंगुबाई हनगल (गायन), पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी), पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आदी जागतिक कीर्तीच्या कलाकारांना पं. आिनदो यांनी साथ केली आहे.
सध्याच्या पिढीतील आश्वासक स्वर म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या, कौशिकी चक्रवर्ती देसिकन यांनीही देश-विदेशात अनेक मैफली गाजविल्या आहेत. कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी पावती खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिली होती, तर उस्ताद विलायत खाँ, उस्ताद अल्लारखा खाँ, उस्ताद अमजद अली खाँ, पं. हरिप्रसाद चौरासिया या सारख्या दिग्गजांनीही कौशिकी यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.
या पाश्र्वभूमीवर, मुंबईत या दोन कलाकारांची ही मैफल रसिकांसाठी नक्कीच पर्वणीची ठरेल. या कार्यक्रमात या दोघांना अनीश प्रधान (तबला) व अजय जोगळेकर (संवादिनी) हे कलाकार साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका फोर्ट येथील ऱ्हिदम हाऊस तसेच दादर येथील महाराष्ट्र वॉच अँम्ड ग्रामोफोन कं. येथे उपलब्ध आहेत.