फटाक्याचे दुष्परिणाम तसे सर्वज्ञात. परंतु, दिवाळीत ते उडविण्याचा मोह अनेकांना आवरला जात नाही. ध्वनी आणि वायु प्रदूषणाला हातभार लावणारी दीपावली यंदा फटाकेमुक्त पध्दतीने साजरी व्हावी, याकरिता अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. त्या अंतर्गत फटाका स्टॉलच्या परिसरात शांततामय प्रबोधन सत्याग्रह केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कमीतकमी फटाके उडवून पैशांची बचत करावी आणि वाचलेल्या रकमेचा गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विनियोग करावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
अंनिसतर्फे गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास प्रतिसाद मिळवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना करावयाच्या आवाहनपत्रावर जयंत नारळीकर, नाना पाटेकर, नरेंद्र जाधव व सचिन तेंडुलकर यांची स्वाक्षरी समितीने मिळविली. त्यामुळे या उपक्रमास लक्षणिय प्रतिसाद मिळाला. ‘फटाके शोभेची दारू उडविणार नाही’ असा संकल्प करण्याऐवजी ‘इतक्या कमी रकमेचे फटाके उडवेल आणि वाचलेल्या पैशातून खाऊ, वैज्ञानिक खेळणी, पुस्तके घेईल’ हा शक्य असलेला होकारात्मक संकल्प विद्यार्थ्यांना चांगलाच भावला.
शिवाय, त्या संकल्प पत्रावर विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही स्वाक्षरी असल्याने कृतीची विश्वासार्हता वाढली. तीन वर्षांपूर्वी १५ कोटी तर दोन वर्षांपूर्वी २० कोटी आणि गतवर्षी २५ कोटी संकल्पपत्रे विद्यार्थ्यांकडून भरून शाळा समितीला मिळाल्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.
फटाके व शोभेची दारू यामुळे हवेत पसरणारे गंभीर वायु व ध्वनी प्रदूषण, फटाके बनविताना आणि उडविताना होणारे अपघात, आगी लागणे, बालमजुरीला मिळणारे प्रोत्साहन आणि कोटय़ावधी रूपयांचा निघणारा धूर याचे गांभीर्य सर्वाच्या लक्षात येऊ लागल्याने या उपक्रमाचा प्रतिसाद वाढत आहे. फटाक्यांच्या वाचलेल्या पैशांतून पुस्तके विकत घेण्याचा पर्याय दोन वर्षांपासून काही ठिकाणी राबविण्यात आला. त्यातून सर्वसाधारणपणे ५० हजार रूपयांची पुस्तके खरेदी करण्यात आली, असा अनुभव आहे. तसेच यामुळे वाचलेल्या पैशातून काही विद्यार्थ्यांनी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. यंदा त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त शहरातून फेरी काढून व व्यापारी बांधवांना कमी फटाके उडविण्याचे आवाहन केले जाणार आहे.
फटाक्यांची ज्या ठिकाणी विक्री होते, तेथे प्रबोधन सत्याग्रह करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व शाळांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.
या बाबतचे संयोजन व अन्य सर्व प्रकारची मदतीसाठी इच्छुक व्यक्ती, संस्था, शाळा आदींनी शहाजी भोसले ९४२२२ १२५५७, अण्णा कडलसकर ९२७०० २०६२१, अनील करवीर ९८२३२ ८०३२७ या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अंनिसच्या ६६६.ंल्ल३्र२४स्र्ी१२३्र३्रल्ल.१ॠ  संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.