जनलोकपाल विधेयकावर राज्यसभेत केवळ चर्चा करण्यासाठी एक वर्षांंचा कालावधी लागतो का, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. हे विधेयक पारित करण्याची सरकारची इच्छाच नसल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, अलिकडेच शस्त्रक्रिया झाल्याने हिवाळी अधिवेशानासून याच मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन रामलीला मैदानाऐवजी दुसरीकडे करण्यात येणार असल्याचेही हजारे यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी हजारे यांना पत्र पाठवून सरकार या विधेयकासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहीती दिली आहे. हजारे त्याला उत्तरादाखल पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नारायणसामी यांचे पत्र वाचून आपणास दु:ख झाले आहे. दोन वर्षांंपासून जनलोकपाल विधेयकासाठी पत्रव्यवहार सुरू असून हे विधेयक आणण्यासाठी सरकाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. दोन वर्षांंत देशातील जनतेला वारंवार धोका देण्यात आला आहे. लोकपाल व लोकआयुक्त विधेयकांबाबतील राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीने केलेल्या शिफारशींनुसार सरकारने राज्यसभेत ही विधायके दुरुस्तीसाठी ठेवण्याच्या सूचना राज्यसभा सचिवालयास केल्याचे नारायणसामी यांनी पत्रात म्हटले आहे.
ही विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही, किंवा ही विधेयके या अधिवेशनात का ठेवण्यात आली नाहीत याचा खुलासा पत्रात करण्यात आलेला नाही. सिलेक्ट कमिटीने आपला अहवाल दि. २३ नोहेंबर २०१२ रोजी पाठविला होता. त्यास एक वर्ष पूर्ण झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही विधेयके आणण्यात आली नसली, तरी पावसाळी अधिवेशनात या विधेयकांचा फैसला होईल अशी अपेक्षा होती. तसे नारायणसामी यांनी आपणास पत्र पाठवून कळविलेही होते. आता हिवाळी अधिवेशन येऊ घातले आहे. या अधिवेशनातही ही विधेयके पारित होतील ही शक्यता आपले पत्र वाचल्यावर वाटत नाही. लोकसभेत हे विधेयक एका दिवसात सर्वसंमतीने पारित झाले. स्थायी समितीतही मंजूर झाले. राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीचा अहवालही वर्षभरापूर्वी सादर झाला. त्यानंतरही हे विधेयक वर्षभर रेंगाळले हे दुर्दैवी असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
पत्रासही विलंबच!
लोकपाल विधेयक पारित करण्यासाठी सरकारने जसा विलंब लावला, तसा विलंब नारायणसामी यांनी हजारे यांना पाठविलेल्या पत्रासही विलंब झाला आहे. हे पत्र हजारे यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी तब्बल एक महिन्यांचा कालावधी लागला. नारायणसामी यांनी दि. २८ ऑक्टोबरला पाठविलेले पत्र हजारे यांच्या कार्यालयास दि. २५ नोव्हेंबरला प्राप्त झाले.
अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र
जनलोकपाल विधेयकावर राज्यसभेत केवळ चर्चा करण्यासाठी एक वर्षांंचा कालावधी लागतो का, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. हे विधेयक पारित करण्याची सरकारची इच्छाच नसल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
First published on: 28-11-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare letter to prime minister