राजकारणातील असुरक्षित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. राजकारणातील महिलांच्या सुरक्षेसाठी अण्णा हजारे यांनी थेट पक्षप्रमुखांना साकडे घालून व्यभिचारी व्यक्तींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली आहे. पक्षप्रमुखांनी याकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या व्यभिचारी उमेदवारांना मतदारराजाने अद्दल घडवावी, असे आवाहन अण्णांनी केले आहे.
दहिसर येथील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, तसेच भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांना स्थानिक आमदार विनोद घोसाळकर यांनी दिलेल्या त्रासाचे प्रकरण तब्बल एक महिना गाजत होते. या संदर्भात काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अलिकडेच अण्णा हजारे यांनी भेट घेतली. सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी तात्काळ सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठविले. लोकसभा आणि विधानसभा ही लोकशाहीतील पवित्र मंदिरे आहेत. तेथे निष्कलंक व्यक्ती जाणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तेथे पोहोचलेल्या भ्रष्ट, गुंड आणि लुटारू मंडळींनी लुबाडणूक सुरू केली आहे. ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे पालिकांमध्ये मोठय़ा संख्येने महिला निवडून गेल्या. या महिलांना आता राजकीय नेते मंडळी त्रास देऊ लागले आहेत.
महिलांना त्रास देणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याची जबाबदारी पक्ष प्रमुखांची आहे. आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अशा व्यभिचारी नेत्यांना उमेदवारी देऊ नये, असे अण्णा हजारे यांनी राजकीय पक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर मतदार राजाने व्यभिचारी उमेदवारांना निवडणुकीत धुळ चारावी, असे आवाहन अण्णांनी जनतेला केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा