संपूर्ण देशात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीसाठी दौरे करीत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या येथील शासकीय विश्रामगृहातील मुक्कामासंदर्भात बाळगण्यात आलेली गुप्तता त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीही आश्चर्यदायक ठरली. धुळ्याहून येताना अण्णा मंगळवारी सायंकाळी विश्रामगृहात आले. बुधवारी सकाळी ते ठाण्याकडे रवाना झाले.
भ्रष्टाचार विरोधात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त करीत त्यासाठी अण्णा सध्या विविध राज्यांमध्ये सभा घेत आहेत. एप्रिलमध्ये ते महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. धुळेमार्गे त्यांचे येथील विश्रामगृहात सायंकाळी सातच्या सुमारास आगमन झाले. अण्णांच्या मुक्कामाविषयी कोणालाच माहिती देण्यात आलेली नसल्याने पोलीस बंदोबस्ताव्यतिरिक्त फारशी गर्दीही नव्हती.
ज्येष्ठ कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी अण्णांचे स्वागत केले. या वेळी अण्णांनी भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनासाठी समविचारी, सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र यावयास हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकशाहीत जनशक्तीपुढे सत्ताधाऱ्यांना झुकावेच लागेल. भ्रष्टाचार व अन्यायाविरूध्द जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे सभांदरम्यान निदर्शनास येत असल्याची माहितीही त्यांनी करंजकर यांना दिली. बुधवारी पहाटे ते ठाण्याकडे रवाना झाले. अण्णांच्या या मुक्कामाविषयी पाळण्यात आलेली गुप्तता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा