माहिती अधिकार तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते आहोत असे सांगून, हजारे यांच्या छबीचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्यांना हजारे यांच्या वकिलाने चपराक दिली आहे. हजारे यांच्या नावाचा तसेच छबीचा वापर करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
हजारे यांच्या नावाचा तसेच फोटोचा गैरवापर करून लोकांची तसेच कंपन्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे लोक कंपन्या तसेच नागरिकांना ब्लॅकमेल करीत आहेत. हे तथाकथित कार्यकर्ते स्वत:च्या लेटरहेडवर तसेच व्हिजिटिंग कार्डवर अण्णांचा फोटो छापतात. ते हजारे यांच्या कोणत्याही संघटनेचे कार्यकर्ते नसल्याचेही उघड झाले असून, या संदर्भात अलीकडेच पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे. या तक्रारदाराने भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पुणे कार्यालयाकडे तसेच हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडेही या तथाकथित कार्यकर्त्यांची तक्रार केली आहे.
हजारे यांच्या वतीने वकील पवार यांनी अशाप्रकारचे फोटो असलेले लेटरहेड तसेच व्हिजिटिंग कार्ड घेऊन कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास राळेगणसिद्घीच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader