मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेच्या ४ हजार मुला-मुलींनी शोभायात्रा काढून सामाजिक व शैक्षणिक जाणिवा जागृत करण्याचा संदेश दिला.
गोदावरी लाहोटी कन्या शाळेच्या प्रांगणातून सकाळी निघालेली शोभायात्रा दयाराम रस्ता, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, गांधी चौक, मिनी मार्केट मार्गे बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या मदानावर विसर्जित झाली. मुला-मुलींच्या घोषणांनी लातूर शहर दणाणून सोडले. राजस्थान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षा, गोदावरी लाहोटी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मता, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य व स्वच्छता, पुरणमल लाहोटी पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी स्त्रीसुरक्षा, केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचे देखावे सादर केले.
गोदावरी कन्या विद्यालयातील ४० मुलींनी बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. सायकल चालवा, पृथ्वी वाचवा, मुलींचे शिक्षण समाजाचे रक्षण, देशाची शान साक्षरता अभियान आदी घोषणांचे फलक लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत मुरलीधर इन्नानी, लक्ष्मीरमण लाहोटी, श्यामसुंदर भार्गव, शैलेश लाहोटी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Story img Loader