शहरात सध्या टंचाईचे भीषण सावट असून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच शहरात टँकरने पाणी वाटप सुरू करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र टँकरने पाणी वाटपाचे नियोजन अंतीम टप्प्यात असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली. दुसरीकडे टंचाईला पालिका प्रशासन व नगरसेवकांची बेपर्वा वृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप करत पाणी पुरवठा सुरळित होत नाही तोपर्यंत मनमाडकरांनी कोणताही कर भरू नये, असे आवाहन शहरातील प्रमुख नागरिकांच्या बैठकीत करण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण व पर्यायी पाटोदा साठवणूक तलाव कोरडा पडल्यानंतर टंचाईचे संकट अधिक गहिरे झाले. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने शहरातील ८० टक्क्यांपेक्षा अधिक कुपनलिका बंद पडल्या आहेत. शहरात निर्माण झालेल्या टंचाईवर पालखेडचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, हाच एकमेव पर्याय असल्याचे बैठकीत अनेकांनी मांडले. या प्रश्नी तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात येऊन त्यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे. बैठकीस माजी नगराध्यक्ष रहेमान शाह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळवंत आव्हाड, अशोक परदेशी, बबन आव्हाड, एस. एम. भाले, दिलीप शिरसाठ उपस्थित होते.
दरम्यान स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ फेडरेशनतर्फे शहरातील टंचाई व रेंगाळत पडलेले विविध प्रश्न यासंदर्भात दोन दिवसीय उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा समारोप नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी पालिका प्रशासनातर्फे टंचाईच्या पाश्र्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी केदार यांनी दिली. नगराध्यक्ष राजेंद्र पगारे तसेच युथ रिपब्लिकनसह रिपाइं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरासाठी लवकरच पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन मिळणार असल्याचे केदार यांनी सांगिले. टँकरव्दारे शहराच्या सर्व भागात पाणी वितरणाचे नियोजन केले जात असून ते अंतीम टप्प्यात आहे. लवकरच सर्व प्रभागांमध्ये टँकरने पाणी वितरण केले जाईल, प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. मनमाडकरांना पिण्याचे शुध्द पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे, शहरात औद्योगिक वसाहत स्थापन करावी, मनमाड तालुका घोषित होत नाही तोपर्यंत शहरात तालुकास्तरीय उपकार्यालय सुरू करावे, सेतू कार्यालय मनमाडला पूर्ववत सुरू करावे, राज्य मार्गावरील अपघात टाळण्यासाठी पथदीप कायम स्वरुपी सुरू करावे, राज्यमार्गावर गतीरोधक करावे, आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा नेते बाळासाहेब जगताप, पी. आर. निळे, केशव पाटील, शहराध्यक्ष विनय गरूड आदींची भाषणे झाली. निवेदन देण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांच्याशी संपर्क होत नाही, तालुक्याच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, अशी टीका करत निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तालुकाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, शहर सचिव नाना निकम आदींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. समारोप प्रसंगी रिपाइंचे तालुकाध्यक्ष कैलास अहिरे, उपाध्यक्ष दिनकर धिवर, सागर शिरसाठ आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत कर न भरण्याचे आवाहन
शहरात सध्या टंचाईचे भीषण सावट असून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच शहरात टँकरने पाणी वाटप सुरू करण्यात येणार आहे. शहरात सर्वत्र टँकरने पाणी वाटपाचे नियोजन अंतीम टप्प्यात असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.
First published on: 12-02-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annoucement for paying the tax towards water supply is not become good