अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्हय़ात दोन हजार कोटींचे नुकसान झाले असताना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केलेली नुकसान भरपाईची मागणी तुटपुंजी आहे. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून या जिल्हय़ातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी खासदार हंसराज अहीर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुसळधार पावसाने या जिल्हय़ात हजारो घरांची पडझड झाली. सार्वजनिक मालमत्तेचे कोटय़ावधीचे नुकसान झाले. रस्ते, विद्युत खांब वाहून गेले.
शेतकऱ्यांच्या २ लाख १६ हजार हेक्टरमधील पीक वाहून गेले. बहुतांश तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे येत्या दोन वष्रे त्यांना पीकही घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. दुबार पेरणीची शक्यता  दिसत नाही. अतिवृष्टीमुळे या जिल्हय़ात किमान दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अतिशय तुटपुंजी मदत मागितली आहे. पंधरा ते वीस दिवसांपासून शेतीची संपूर्ण कामे ठप्प आहेत. शेतकऱ्यांच्या घरी खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत शासनाने किमान कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर यांना सरसकट खावटी उपलब्ध करून द्यावी, शेतीचे नुकसान बघता शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे पुरता नागवला गेला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत उपलब्ध करून द्यावी, या जिल्हय़ात ओला दुष्काळ जाहीर करावा व पूरपीडितांना शासनाकडून सर्व प्रकारची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा