तीन वर्षांपूर्वी झालेली घोषणा कागदावरच
रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरहून एक नवी गाडी सुरू होण्यासह विदर्भाला चार नव्या गाडय़ा मिळाल्या असून, दोन नव्या प्रकल्पांची आश्वासने मिळाली आहेत. मात्र तीन वर्षांपूर्वी जाहीर झालेला एक प्रकल्प अद्यापही सुरू झाला नसल्यामुळे या नव्या प्रकल्पांचे स्थान सध्या कागदावरच राहणार आहे.
नव्याने ‘टर्मिनस’चा दर्जा मिळालेल्या अजनी स्थानकावरून वाशीम- हिंगोली मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकादरम्यान नवी साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू होणार आहे. सध्या या मार्गाने नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही एकच गाडी जाते. रेल्वेमंत्र्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या एक्सप्रेस गाडय़ांपैकी तीन नागपूरमार्गे जाणार असून, एक वर्धा मार्गे म्हणजे नागपूर विभागातून जाणार आहे. याशिवाय विभागाला एक पॅसेंजर गाडीही मिळाली आहे. काही गाडय़ांची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) वाढवण्यात आली आहे.
बिकानेर- चेन्नई ही संपूर्णपणे वातानुकूलित साप्ताहिक गाडी जयपूर, सवाई माधोपूर, नागदा, भोपाळ, नागपूर, विजयवाडा मार्गे धावेल. जबलपूर- यशवंतपूर ही साप्ताहिक एक्सप्रेस इटारसी, नागपूर, धर्मावरम मार्गाने जाईल. पुरी- साईनगर शिर्डी या साप्ताहिक एक्सप्रेसचा मार्ग संबलपूर, टिटलागड, रायपूर, नागपूर, भुसावळ असा राहील. तर गांधीधाम- विशाखापट्टणम ही साप्ताहिक एक्सप्रेस अहमदाबाद, अकोला, वर्धा, बल्लापूर, विजयवाडा या मार्गाने धावणार आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या अमरावती- नरखेड मार्गावर नवीन अमरावती व नरखेड स्थानकांदरम्यान पॅसेंजर गाडी सुरू करण्यात येणार असून ती दररोज धावेल. याशिवाय भुसावळ- अमरावती ही सध्या दररोज धावणारी पॅसेंजर नरखेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. या सर्व गाडय़ा येत्या आर्थिक वर्षांत सुरू होणे अपेक्षित आहे. सध्या आठवडय़ातून दोन दिवस धावणारी ११४५३ नागपूर- अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस यापुढे आठवडय़ातून तीन दिवस धावणार असून, सध्या तीन दिवस धावणारी १२१५९ जबलपूर- अमरावती एक्सप्रेस दररोज धावेल. प्रवाशांना पेयजल पुरवण्यासाठी नागपूर येथे रेल्वेच्या ‘रेल नीर’ या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा ‘बॉटलिंग प्लांट’ स्थापन करण्यात येईल. तसेच रेल्वेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘मल्टि- डिसिप्लिनरी ट्रेनिंग युनिट’ (बहुविध प्रशिक्षण केंद्र) नागपुरात स्थापन करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. या ठिकाणी सिग्नलिंगसह इतर यंत्रणांबाबत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल.
याशिवाय नागपूर रेल्वे स्थानकावर एक ‘एक्झिक्युटिव्ह लाऊंज’ तयार करण्यात येणार असल्याचेही मंत्र्यांनी जाहीर केले. या आलिशान लाऊंजमध्ये प्रवाशांना सशुल्क चहापानाची व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. सध्या असे लाऊंज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आहे.
तीन वर्षांपूवीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केली होती, परंतु त्यादृष्टीने अद्याप जागादेखील पाहण्याइतकी प्रगती झालेली नाही. त्यामुळे नव्या घोषणा केव्हापर्यंत प्रत्यक्षात येतात याची वाट पाहावी लागणार आहे.
विदर्भात मध्य रेल्वेच्या वाटय़ाला या गोष्टी आल्या असतानाच, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेसाठी नागपूर- नागभीड रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाची खूषखबर आली आहे. सध्या नॅरोगेज असलेला हा मार्ग ब्रॉडगेज झाल्यानंतर तो नागपूरला गोंदिया- चंद्रपूर या मार्गाशी जोडण्याकरता महत्त्वाचा ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा