गंगाखेडच्या व्यंकटेश विद्यालयातील कस्टोडियनच्या ताब्यात असलेल्या स्ट्राँग रूममधून दहावीच्या इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका बाहेर काढल्या गेल्या. त्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून पुन्हा लिहून घेऊन परत करण्याचा प्रकार गंगाखेड पोलिसांनी उघडकीस आणला. इंग्रजीच्या दोन उत्तरपत्रिका पोलिसांनी जप्त केल्या.कस्टोडियन कार्यालयाचे पर्यवेक्षक तथा गंगाखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम. डी. काळे यांच्यासह ७ शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन उत्तरपत्रिका जप्त केल्या असल्या तरी स्ट्राँग रूममधून अजूनही १० उत्तरपत्रिका बाहेरच असल्याचे उघड झाले आहे.
७ मार्चला सकाळी ११ ते २ या वेळेत दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. दोननंतर परीक्षा केंद्रावरून  सर्व उत्तरपत्रिका कस्टोडियन काळे यांच्याकडे जमा करण्यात आल्या. काळे यांना सहकार्य करण्यासाठी इतर चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेपर संपल्यानंतर ताब्यात असणाऱ्या उत्तरपत्रिका बाहेर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांना मिळाली. त्यावरून व्यंकटेश विद्यालयासमोर सापळा रचण्यात आला. दुपारी साडेचारच्या सुमारास जिल्हा परिषदेचे शिक्षक कुबेर भीमराव खांडेकर व गटसाधन केंद्र, गंगाखेड येथे कार्यरत असलेले कंत्राटी शिक्षक अनिल रंगनाथ कळणे यांना दोन उत्तरपत्रिकांसह ताब्यात घेतले. रात्रीच त्यांची चौकशी सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी हा प्रकार जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे जि. प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. बी. गिरी यांनी कस्टोडियनच्या ताब्यात असलेल्या स्ट्राँग रूममधील उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता एकूण १२ उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी सकाळी फौजदार प्रल्हाद गिते यांच्या तक्रारीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी एम. डी. काळे, शिक्षक कुबेर भीमराव खांडेकर, अनिल कळणे, पर्यवेक्षक एस. आर. आणेराव, विठ्ठल अनंतराव रत्नपारखी, आर. एफ. राठोड, एस. आर. मुंढे, तसेच दोन विद्यार्थ्यांविरुद्ध फसवणूक, संघटित गुन्हेगारी, महाराष्ट्र विद्यापीठातील गैरव्यवहार अधिनियम १९९२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मोहन ठोंबरे यांच्या पुढाकाराने चार वर्षांपूर्वी कॉपीमुक्त अभियानास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी कॉपीला प्रोत्साहन देणारे शिक्षक तसेच काही विद्यार्थ्यांवर रस्टीकेटच्या कारवाया करण्यात आल्या. परंतु त्यानंतर कॉपीला आळा बसला. या वर्षी तर चक्क परभणी जिल्ह्य़ात एकही कॉपीबहाद्दूर जिल्हा प्रशासन तथा शिक्षण विभागाला आढळून आला नाही. परंतु गुरुवारी कस्टोडियनच्या ताब्यात असलेल्या उत्तरपत्रिका बाहेर काढून त्या पुन्हा विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्य़ात परीक्षेदरम्यान सर्वकाही आलबेल चाललेले नाही, हेच स्पष्ट झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा