*    ४२ लाखाचा माल जाळून नष्ट
*    संशयितांविरूध्द फौजदारी खटले
गुटखा बंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर धडक मोहीम राबवत सहा महिन्यांत जप्त केलेला तब्बल साडे तीन टन गुटखा अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी येथील विद्युत वाहिनीत जाळून नष्ट केला. या गुटख्याची किंमत तब्बल ४२ लाख रूपये असल्याची माहिती या विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील ज्या ३११ ठिकाणी गुटख्याचा हा माल आढळून आला, तेथील संशयितांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आगामी काळात गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्यात येईल, असेही विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
राज्य शासनाने जुलै २०१२ पासून राज्यात गुटखा बंदीचा निर्णय लागू केला. त्यानंतर अवैधपणे गुटखा विक्री करणारे विक्रेते व व्यावसायिकांवर कारवाईचे सत्र अन्न व औषध प्रशासनाने सुरू केले. २० जुलै २०१२ ते ३१ जानेवारी २०१३ या कालावधीत ठिकठिकाणी छापे टाकून हा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईत तब्बल २३ लाख ९० हजार ८३१ गुटख्याची पाकिटे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत ४१ लाख ३८ हजार ३१२ रूपये असल्याची माहिती या विभागाचे सहआयुक्त (अन्न) सं. भा. पवार, सहाय्यक आयुक्त (अन्न) रा. फ. कोळी यांनी दिली. कन्नमवार पुलाजवळील विद्युत दाहिनीत दुपारी जप्त केलेला साडे तीन टन गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सु. श. क्षीरसागर आणि वि. पं. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत उपरोक्त काळात विभागाच्या पथकांनी घाऊक व किरकोळ विक्रेते, पानटपरी, फेरीवाले, गुटख्याची वाहतूक करणारी वाहने, महापालिकेचे जकात नाके, विक्रेत्यांची गोदामे अशा एक हजार ५४७ ठिकाणी भेटी देऊन तपासणी केली. त्यात ३११ ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विक्रेत्याकडे आढळलेला गुटख्याचा माल जप्त केल्यानंतर या मालाची बिले, पुरवठादार, फर्मचे नांव याबाबतची माहिती जमविण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ३११ जणांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. या संशयितांवर कारवाई व्हावी म्हणून तसे प्रस्तावही विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. गुटखा विक्रीला र्निबध घालण्यासाठी विभागातर्फे धडक कारवाई केली जात असली तरी विक्रेते व पुरवठादार वेगवेगळ्या संकल्पना लढवून मालाचा पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आगामी काळात छोटय़ा विक्रेत्यांपासून ते बडय़ा पुरवठादारापर्यंत सर्वावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा या विभागाने दिला आहे.

छुप्या पध्दतीने विक्री सर्रास
अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कामगिरी केली असली तरी शहरातील जवळपास सर्वच पान टपऱ्यांवर छुप्या पद्धतीने त्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येते. म्हणजेच गुटखा विरोधी मोहीम धडकपणे सुरू असली तरी तितक्याच धडकपणे त्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याने शासनाच्या व्यसनमुक्तीचा मूळ उद्देशाला तिलांजली मिळत आहे. शासनाने हा निर्णय लागू केल्यानंतर पान टपऱ्यांवर लटकणाऱ्या गुटख्याच्या पुडय़ा दिसेनाशा झाल्या. त्यातच अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू केल्याने गुटखा बंदी खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल, असे नागरिकांना वाटू लागले होते. परंतु, अवघ्या महिनाभराच्या काळात अमलबजावणीतील फोलपणा पुढे आला. बहुतेक टपऱ्यांवर लटकणाऱ्या पुडय़ा दिसत नसल्या तरी त्यांची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, निर्णय लागू होण्यापूर्वी जो गुटखा पाच ते सात रूपयांत उपलब्ध होत असे, तोच आता दुप्पट म्हणजे १० ते १५ रूपयांना मिळत असल्याचे सांगितले जाते. छुप्या पद्धतीने चाललेल्या गुटख्याच्या विक्रीमुळे घाऊक व छोटय़ा विक्रेत्यांची चांदी झाली आहे. कारण, त्यांना बंदीच्या निर्णयाने दामदुप्पट नफा कमविण्याची संधी उपलब्ध करून दिली. शाळा व महाविद्यालयीन अनेक विद्यार्थी या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गुटखा बंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर त्यांना गुटखा न मिळणे अभिप्रेत होते. परंतु, अशा सर्व घटकांना विनासायास हा माल जादा दराने उपलब्ध होत असल्याने शासनाचा मूळ उद्देश अधांतरी राहिला आहे. वास्तविक, सर्वच पान टपऱ्यांवर छुप्या पद्धतीने गुटखा उपलब्ध असल्याने छुप्या पद्धतीने परराज्यातून त्याची आवकही मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होते. या विभागाला प्रत्येक पानटपरीवर छापा टाकणे शक्य नसले तरी संबंधितांना माल पुरविणाऱ्या घाऊक विक्रेत्यावर ते कठोर कारवाई करू शकतात. परराज्यातून माल आणून तो छोटय़ा विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्याची साखळी मोडीत काढल्यास त्याच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध आणता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.