नायकाच्या व्यक्तिरेखा न साकारताही वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अभिनेता अनुपम खेर यांची आशिया खंडातील सवरेत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणना करण्यात आली आहे. ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या ताज्या अंकात आशियातील सवरेत्कृष्ट पाच अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात चीनमधील ली बिंगबिंग, दक्षिण कोरियातील ली ब्युंग हून, थायलंडमधील इको युवाईस, भारतातील अनुपम खेर आणि हाँगकाँगमधील आरोन क्वोक अशा पाच अभिनेत्यांचा समावेश आहे. अनुपम खेर यांना ‘आगमन’ आणि ‘सारांश’ या दोन चित्रपटांतील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळाली असली तरी नंतर बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपटांतून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये ‘बेण्ड इट लाईक बेकहॅम’, ‘ब्राइड अ‍ॅण्ड प्रीज्युडाईस’, ‘द सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक’ या चित्रपटांचा समावेश आहे.