‘पीपली लाईव्ह’ या पदार्पणातील चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर अनुषा रिझवी आता ‘ओपिअम’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अफूच्या व्यापारातून ब्रिटिशांनी प्रचंड पैसा कमावला आणि देशातील शेतक ऱ्यांचे कसे नुकसान झाले या विषयावर असलेला हा चित्रपट आहे.
विषय जरी अफूचा व्यापार, त्याचे ब्रिटिशांना झालेले फायदे, भारतीयांचे नुकसान हा असला तरी हे सारे दोन प्रेमकथांच्या माध्यमातून घडत जाते. महत्त्वाचे म्हणजे सुप्रसिद्ध इंग्रजी  कादंबरी   ‘सी ऑफ पॉपीज्’ वर हा  चित्रपट बेतलेला आहे. ऐतिहासिक पाश्र्वभूमी तर आहेच, परंतु ‘अॅक्शन थ्रिलर’ प्रकारचा हा चित्रपट असेल, असे अनुषा रिझवी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
चित्रपटाविषयी अधिक माहिती विचारली असता त्या म्हणाल्या की, आता कुठे आम्ही लेखक-प्रकाशकांकडून फक्त हक्क घेतले आहेत. पती आणि पटकथा लेखक मेहमूद फारुकी यांच्यासोबत अनुषा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहोत. परंतु, आता हक्क मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अद्याप पटकथा लिहिण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘पीपली लाईव्ह’सारखा कमी बजेटचा आणि अतिशय वैशिष्टय़पूर्ण विषयापुरता मर्यादित असलेला चित्रपट केल्यानंतर एकदम व्यापक विषय, त्यातही ऐतिहासिक पाश्र्वभूमी असल्यामुळे तत्कालीन सत्य घटना, त्याला आजच्या प्रेक्षकाला आपला विषय वाटेल अशा पद्धतीने करावी लागणारी पटकथेची गुंफण हे सारे खूपच आव्हानात्मक नाही का वाटत, या प्रश्नावर अनुषा रिझवी म्हणाल्या की, आम्हाला दोघांनाही कादंबरी खूप भावली. वास्तविक चित्रपटाच्या नावाची घोषणा केली असली, तरी मुळात याची पटकथा लिहिणे हेच खूप मोठे आव्हान आहे.
त्याचबरोबर ‘सी ऑफ पॉपीज्’ या कादंबरीला मॅन बुकर पारितोषिक मिळाल्यानंतर जगभरात या कादंबरीचे वाचक आहेत. परंतु, या विषयावर चित्रपटातून फारसा प्रकाशझोत टाकण्यात आलेला नाही. अफूच्या व्यापारामुळे जबरदस्तीने शेतक ऱ्यांना अफूची शेती करायला लागल्यामुळे झालेले नुकसान हा विषय मनाला भिडणारा आहे, म्हणूनच आम्ही चित्रपट करण्याचे आव्हान पेलले आहे, असेही अनुषा रिझवी यांनी आवर्जून नमूद केले. पटकथा लिहून पूर्ण करीत असतानाच आपण त्याचबरोबरीने निर्मात्यांचा शोध घेणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.