बॉलीवूडची अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणींची संख्या प्रचंड आहे. त्यासाठी अनेकजणींची धडपड सुरू असते. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करून अल्पावधीत बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा ‘जब तक है जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु, यशाच्या शिखराचे सोपान आता कुठे चढायला सुरुवात होत असतानाच अनुष्का शर्मा म्हणतेय की, आयुष्यभर अभिनेत्री राहणे काही आपल्याला रूचणारे नाही. तिच्या या उद्गारांनी बॉलीवूडमधील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आयुष्यभर फक्त अभिनेत्री राहाणे मला आवडणार नाही. बॉलीवूडपटात अभिनय करणे आणि ‘ग्लॅमर’ व ‘स्टारडम’ हा आयुष्याचा एक भाग आहे. संपूर्ण आयुष्यभर केवळ चित्रपटातून अभिनय करणे हे माझे ध्येय नाही, तर आणखी खूप वेगळ्या गोष्टी आयुष्यात करण्याची इच्छा आहे, असेही अनुष्काचे म्हणणे आहे.
‘स्टारडम’ मिळतोय ही चांगली बाब असली तरी बॉलीवूडमध्ये मी बाहेरून आले आहे. माझी पाश्र्वभूमी बॉलीवूडची नाही. त्यामुळे ‘स्टारडम’ कायम बरोबर राहणार नाही, हा तात्पुरता टप्पा असतो हे वास्तवही मला चांगलेच ठाऊक आहे, असे विधान अनुष्काने केले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये यश कायमस्वरूपी नसते याचीही आपल्याला जाणीव असल्याचे ती सांगते.
अभिनय करणे हे माझे संपूर्ण आयुष्यभराचे ध्येय नाही. त्यामुळे आता चित्रपट भरपूर मिळत असले तरी ही प्रक्रिया कायम सुरू राहणार नाही, याची पुरती जाणीव मला आहे, असेही अनुष्काने स्पष्ट केले.
‘कधी कधी मला असे वाटते की लोक तोंडावर तुमची स्तुती करतात. पण म्हणूनच चित्रपटांची पटकथा वाचल्यानंतर, भूमिका निवडीपूर्वी मी माझ्या भावाचा सल्ला घेते. सध्या अनुष्काकडे विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मातृ की बिजली का मंडोला’ , राजकुमार हिरानीचा ‘पीके’, अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेलवेट’ हे चित्रपट आहेत. या तिन्ही चित्रपटांमध्ये ती अनुक्रमे इमरान खान, आमिर खान, रणबीर कपूर या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत झळकणार आहे.
चित्रपट स्वीकारताना सर्वात आधी मी पटकथा वाचल्यानंतर त्यातील गोष्टीशी स्वत:ला जोडू शकते का हे पाहते, त्यानंतर दिग्दर्शक कोण आहे ते पाहते आणि नंतर माझी भूमिका कोणती आहे, भूमिकेचे चित्रपटातील महत्त्व काय आणि किती आहे, सरतेशेवटी एखादा चित्रपट करताना तो मी ‘एन्जॉय’ करू शकेन की नाही याचे अंदाज बांधून  मगच चित्रपट स्वीकारायचा की नाही हे ठरविते, असेही अनुष्का शर्माने मोकळेपणी सांगितले. चित्रपटात केवळ शोभेची वस्तु असल्यासारखी भूमिका वठवायची असेल तर निश्चितच अशी भूमिका साकारण्यास मी तयार नसते, असेही तिने स्पष्ट केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा