नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच अनुष्का शर्मा नको त्या कारणांनी अडचणीत आली आहे. आधी ओठांवरची तथाकथित शस्त्रक्रिया, मग विराट कोहलीबरोबरचे अफेअर या सगळ्यांमुळे तिची चांगलीच कोंडी झाली होती. त्यात भरीस भर म्हणून या वर्षांतले तिचे दोन मोठे चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होणार होते. त्यामुळे ती चांगलीच धास्तावली होती.
राजकुमार हिरानीचा ‘पी.के.’ आणि अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हे दोन महत्त्वाकांक्षी चित्रपट नाताळच्याच मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याने ती काळजीत पडली होती. पण, अनुरागने आपला चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याचे जाहीर केल्यानंतर अनुष्काने सुटकेचा श्वास सोडला.यश चोप्रा दिग्दर्शित ‘जब तक है जान’नंतर अनुष्का पडद्यावर दिसलेलीच नाही. गेले वर्षभर ती एकापाठोपाठ एक दोन चित्रपटांचे चित्रिकरण करत होती. त्यातला एक आहे आमिरबरोबरचा ‘पी.के.’ आणि दुसरा होता रणबीरबरोबरचा ‘बॉम्बे वेल्वेट’. हे दोन्ही चित्रपट बिग बजेट आणि या वर्षीचे चर्चेतले चित्रपट आहेत. त्यामुळे यावर्षी अनुष्काच्या यशाचा डोलारा या दोन चित्रपटांवर अवलंबून आहे. अनुरागने फार आधीच चित्रपटासाठी यावर्षीच्या नाताळची तारीख घेतली होती. पण, नाताळवर तीन खानांचे जास्तच प्रेम असल्याने आमिरनेही राजकुमार हिरानीला ‘पी.के.’साठी तोच मुहूर्त धरायला सांगितला. एवढेच नाही तर आपल्या चित्रपटासाठी कमीत कमी दोन आठवडे भरघोस बुकिंग मिळेल या पध्दतीने शो लावण्याचा तगादाही आमिरने चित्रपटगृह मालकांकडे लावला होता.
हे सगळे ऐकल्यानंतर अनुराग आणि कंपनी चिंतेत पडलीच; पण, अनुष्काच्या जीवाला दुहेरी घोर लागला होता. राजकु मार हिरानी आपला चांगला मित्र असल्याने तो यावर काहीतरी पुनर्विचार करेल, अशी अनुरागची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तशी कुठलीच चिन्हे नव्हती. रणबीरने मात्र आपला चित्रपट चांगला असल्याने ‘पी.के.’ला टक्कर देण्यापेक्षा वेगळ्या तारखांचा विचार करण्याविषयी अनुरागला सुचवले. गेल्याच आठवडय़ात ‘बॉम्बे वेल्वेट’चा चित्रिकरणचा अखेरचा दिवस होता. त्याच दिवशी अनुरागने चित्रपटासाठी २८ नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली. त्यांनी याच तारखेचा केक कापला आणि २८ आकडा मिरवणारे टी-शर्ट्स घालून त्यांनी धम्माल पार्टीही केली. हा दिवस अनुष्कासाठी सगळ्यात आनंदाचा ठरला आहे ते म्हणजे काही न करता तिची कोंडी सुटली आहे. आता नोव्हेंबरमध्ये ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि महिन्याभराने ‘पी.के.’ प्रदर्शित होणार असल्याने दोन्ही चित्रपटांना तिकीटबारीवर कमाई करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

Story img Loader