जिल्हा परिषदेच्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडीत कुरबुरी व अस्वस्थता वाढू लागली आहे. पूर्वी विरोधी काँग्रेस सदस्य जिल्हा परिषदेतील कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत होते. आता राष्ट्रवादीतील सदस्यांसह सत्तेत सहभागी असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे सदस्यही जाहीर असंतोष प्रकट करू लागले आहेत. एक वाद, टीकेचे मोहोळ शमते न तोच दुसरे वादाचे मोहोळ उठत असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही सध्या हैराण झाले आहेत. राष्ट्रवादीतील श्रेष्ठींनी तर याकडे साफ दुर्लक्ष केलेले दिसते.
जिल्हा परिषदेमधील सत्तेत राष्ट्रवादी समवेत भाजप-सेना युतीसह एक कम्युनिस्ट व दोघे अपक्ष सहभागी आहेत. सत्तेतील दीड वर्षांनंतर आता सर्वच जण कामाबद्दल असमाधन व्यक्त करू लागले आहेत. कामे मार्गी लागत नाहीत, निधी मिळूनही मंजुरी प्रलंबित आहेत, त्वरित निर्णय होत नाही, अध्यक्ष-उपाध्यक्ष-सीईओ दालनात उपस्थित राहात नाहीत, केवळ ‘अधिकारी राज’ सुरू आहे, पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या तक्रारींची सुरुवात राष्ट्रवादीतीलच प्रमुख सदस्यांनी केली. त्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पदाधिकारी व सदस्यांसमवेत दोन बैठकाही घेतल्या, मात्र वाद शमला नाही.
त्याची लागण सत्तेतील सेना-भाजपच्या सदस्यांमध्ये झाली. मध्यंतरी या सदस्यांनी दबावगट निर्माण करत आंदोलनाचा इशाराही दिला होता. अध्यक्षांना त्यांची समजूत काढण्यासाठी धावपळ करावी लागली. काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील सेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणही केले. दुष्काळी परिस्थिती हाताळताना जिल्हा प्रशासनातील विशेषत: महसूल अधिकाऱ्यांनी अध्यक्षांना दाद न दिल्याने अखेर पालकमंत्री व विभागीय आयुक्तांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. पालकमंत्रिपद बदलल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या, मंत्री मधुकर पिचड यांच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्या फोल ठरतात काय अशी शंका आता सदस्यच उपस्थित करू लागले आहेत.
युतीच्या सदस्यांपाठोपाठ काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. या टीकेचे खंडण करण्यासाठी सत्तेतील इतर पदाधिकारी अध्यक्षांच्या मदतीला धावले खरे, मात्र ही मदत केवळ वरवरची होती काय, असा प्रश्नच सेनेचे, कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी जाहीर आक्षेप घेतल्याने निर्माण झाला. तांबे यांच्या आक्षेपांना भाजपच्या सभापती हर्षदा काकडे यांनीही दुजोरा दिल्याने सत्ताधारी गटातील मतभेद उघड झाले आहेत. आता सत्ताधारी पदाधिकारीच उपोषणाची भाषा करू लागल्याने मतभेदाची दरी अधिक रुंदावली आहे.
अध्यक्ष विठ्ठलराव लंघे नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा राष्ट्रवादीच्याच सदस्यांचा आक्षेप आहे. सदस्यांना आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी कामाच्या मंजुरीला त्यांना वेग हवा आहे. शिवाय दोन्ही काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी, राज्यात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीशी ‘घरोबा’ करून सत्ता मिळवली, तेथील आघाडय़ा संपुष्टात आणण्याचे सूतोवाच केले आहे. त्याकडेही अनेकांचे लक्ष आहे. सदस्यांतील अस्वस्थता बाहेर पडण्याचे हेही एक कारण आहे.

Story img Loader