‘अरे, आपल्या पोरांना घेऊन पोलीस ठाण्यात या. एका अधिकाऱ्याला धडा शिकवायचा आहे. आमदारांनाही कळवा. आपल्याला पकडतात म्हणजे काय? त्यांनाही घेऊन या. या अधिकाऱ्यांना दाखवतो आपण कोण आहोत ते.’ तारस्वरात तो तरूण आपल्या महागडय़ा भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी सांगत होता. त्याचे हे वक्तव्य सुरू होते चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून आणि काही पोलिसांच्या देखत! मात्र त्या तरूणाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदण्याशिवाय काहीही कारवाई होऊ शकली नाही. यावरूनच नेहरूनगर पोलिसांचे मनोधैर्य किती खचले आहे, हे लक्षात येते. पण या खच्ची मनोधैर्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या नेहमीच्या कामावर किती विपरित परिणाम होत आहे याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जवळपास अख्खे पोलीस ठाणे निलंबित झाल्यावर नेहरूनगर पोलीस ठाण्यामध्ये उरलेल्या पोलिसांचे मनोधैर्य पदोपदी खच्ची करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘कोणीही येतो आणि टपली मारून जातो’ अशी अवस्था संपूर्ण पोलीस ठाण्याची झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी इतरांना सावरण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत.
मंगळवारी मध्यरात्री तीन तरूण एका मोटार सायकलवरून जात असताना त्यांना पोलिसांनी पकडले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता त्यातील एकाने आपल्या विभागात फोन करून मित्रांना पोलीस ठाण्यात मुले आणण्याचा सल्ला दिला. आपल्याला पकडतात म्हणजे काय असा मस्तवाल भाव त्याच्या बोलण्यात होताच; पण हे पोलीस आपल्या पक्षाच्या आमदारांचे बटीक आहेत आणि आपले मिंधे आहेत असाच भाव त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. त्याला ज्या गुन्ह्यासाठी पकडण्यात आले होते तो अत्यंत क्षुल्लक होता आणि त्याचा दंड केवळ ११० रुपये होता. त्याचे तारस्वरातील आपल्याच अधिकाऱ्यांविषयी असे बोलण्याचा तेथील काही पोलिसांना राग आला आणि त्यांनी त्याचा फोन काढून घेत त्याला कोठडीत बंद केले. हा तरूण कोणत्यातरी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे हे पोलिसांच्या लक्षात आले होते. मात्र त्याने केलेल्या फोनचा व्हायचा तो परिणाम झाला.
काही वेळातच एक महिला काही मुलांसह पोलीस ठाण्यात आली. आल्याआल्या त्या महिलेने एका अधिकाऱ्याचा उल्लेख करत आपण तो किती भ्रष्ट आहे हे कोर्टात सांगू, असे ओरडत त्या अधिकाऱ्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली. पण कोणीही तिला अडवू शकले नाही. फक्त तिला पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढण्यात आले. पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे राहत तिने अनेकांना फोन लावले आणि त्या तरूणाला अटक होतेच कशी, असा सवाल करीत त्याला त्वरित सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणू लागली. दोन ते अडीच तास हा प्रकार सुरू होता. अखेर त्या तरूणावर अदखलपात्र गुन्हा नोंदवून सोडून देण्यात आले. हा तरूण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिलिंद कांबळे यांचा कार्यकर्ता असून त्याचे नाव विजय पवार असे आहे.
उपरोक्त घटना ही एक उदाहरण आहे. मात्र या पोलीस ठाण्यामध्ये दररोज एखादी घटना अशी घडते आहे. परिणामी पोलिसांचा वचक राहिला नसल्याने नेहरुनगर पोलीस ठाण्यामध्ये केवळ नाममात्र कायद्याचे राज्य सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा