सध्याची राजकीय स्थिती बघता येत्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे भाकित वर्तवून काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केली. एका प्रकरणात भंडारा येथील न्यायालयात उपस्थित राहून मुंबईला परत जाताना नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम आदमी पक्षाने काँग्रेसला पराभूत करून दिल्लीमध्ये सत्ता प्राप्त केली असली तरी संपूर्ण देशात मात्र आपची जादू चालणार नाही. विजेचा खांब जेथे पोहचला नाही, तेथे काँग्रेस पोहोचली आहे. गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. सध्या काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी कुणाचेही नाव पुढे केले नाही. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हे योग्य उमेदवार राहू शकते, असेही निरुपम म्हणाले. प्रियंका गांधी यांनी कोणती जबाबदारी स्वीकारावी, हे सोनिया गांधीच ठरवतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
दिल्लीतील आपचे सरकार वीज दर कमी करू शकते तर महाराष्ट्राचे सरकार का करू शकत नाही, याच मागणीसाठी आंदोलन करून आपल्याच पक्षाला निरुपम यांनी घरचा आहेर दिला होता. या प्रश्नाच्या उत्तरात निरुपम म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. सध्या मुंबईमध्ये रिलायन्स कंपनीचे दर सर्वाधिक आहे. हे कर रद्द करावे, अशी आमची मागणी आहे. रिलायन्स कंपनीने वाढवलेले कर रद्द केले तर २० ते २५ टक्के विजेचे दर कमी होऊ शकते. खासगीकरणाच्या नावावर वीज कंपन्या सामान्य नागरिकांचे शोषण करीत आहेत. हे शोषण थांबविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. खासगी वीज कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या कराराची फेरतपासणी करावी, तसेच वीज नियामक आयोगाने पारदर्शकपणे काम करावे, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली. अभिनेते सलमान खान यांनी नरेंद्र मोदीची केलेली स्तुती तसेच विवेक ओबेरॉय यांनी नागपुरात केलेले वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असेही निरुपम म्हणाले. यावेळी उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

Story img Loader