मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनने एक अभियान सुरू केले आहे. जे निवृत्तीवेतनधारक निवृत्तीनंतर शासकीय, महानगरपालिका अथवा तत्सम सेवेत असतील त्यांना निवृत्तीवेतनावर महागाई सहाय्य मिळत नाही. त्यामुळे अशा व्यक्ती वगळून अन्य निवृत्तीवेतनधारकांना अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना किमान मूळ निवृत्तीवेतन १२०० रुपये, महागाई सहाय्य मिळून सध्या ४३०२ रुपये मिळणे गरजेचे आहे. कुटुंब वेतनधारकाचा मुलगा अथवा मुलगी अनुकंपा तत्त्वावर नोकरीत असेल तरीही त्यांना महागाई सहाय्य अनुज्ञेय आहे.
तथापि, अशा प्रकरणात महागाई सहाय्य मिळत नसल्याचे आढळून आले आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे ज्या निवृत्तीवेतनधारकांना, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ४३०२ रुपयांपेक्षा कमी निवृत्तीवेतन मिळत असल्यास अथवा अन्य कोणतीही समस्या असल्यास त्यांनी असोसिएशनच्या कार्यालयात म्हणजेच खोली क्रमांक ९, तळमजला, मुंबई महानगरपालिका, जी – उत्तर विभाग कार्यालय, जे. के. सावंत मार्ग, प्लाझा सिनेमाजवळ, दादर (प.), मुंबई २८ येथे दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत (शनिवार-रविवार आणि सुटीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, असे असोसिएशनने कळविले आहे. अधिक माहितीसाठी ब. बा. आवचार (९८३३७०२३९९) अथवा र. ना. शेर्लेकर (९८१९६३१००२) यांच्याशी संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा