दिल्लीत १९ मार्चला आयोजित रॅलीत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य व माजी खासदार एस. रामचंद्रन पिल्ले यांनी सेवाग्राम येथे आयोजित जाहीर सभेत केले.
नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर माकपतर्फे केंद्र शासनाच्या निषेधार्थ १९ मार्चला देशव्यापी रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीच्या प्रचारार्थ माकपतर्फे देशाच्या चारही भागातून संघर्ष संदेश यात्रा आयोजित करण्यात येत आहे. खासदार सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते दिल्ली, खासदार वंृदा करात यांच्या नेवृत्वाखाली कोलकाता ते दिल्ली, खासदार प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता ते दिल्ली, तर रामचंद्रन पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली असे प्रचार जत्थे निघाले आहेत.
यापैकीच एक असणारा जत्था सेवाग्रामला पोहोचला. त्याचे नेतृत्व करणारे रामचंद्रन पिल्ले यांनी सेवाग्रामला आयोजित सभेत बोलताना नमूद केले की, देशात चार लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात. बेरोजगारी वाढत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढून गरीबांचा अन्नधान्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. महागाईचा कहर झाला. अशी परिस्थिती केंद्रातील यूपीए सरकारमुळे निर्माण झाली आहे. हे सरकार सत्तेवरून पायउतार व्हावे म्हणून देशव्यापी रॅली काढण्यात आली आहे. त्यात जनतेने मोठय़ा संख्येने हजर रहावे, असे आवाहन पिल्ले यांनी केले.
याप्रसंगी खासदार एम.ए. बेबी, विद्यार्थी नेते विजयकिशन श्रीनिवास राव, तसेच स्थानिक नेते चंद्रभान नाखले, यशवंत झाडे, प्रभा घंगारे, सीताराम लोहकरे, सरपंच संजय भोयर, प्रा. उदयन शर्मा आदी उपस्थित होते. प्रचार जत्था यानंतर नागपूरमार्गे मध्यप्रदेशाकडे रवाना झाला.
दिल्लीतील रॅलीत सहभागी होण्याचे माकपचे आवाहन
दिल्लीत १९ मार्चला आयोजित रॅलीत मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य व माजी खासदार एस. रामचंद्रन पिल्ले यांनी सेवाग्राम येथे आयोजित जाहीर सभेत केले.
First published on: 13-03-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal from makap for participate in delhi rally