राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरे करताना स्वत:चे मोठे फोटो फ्लेक्सवर न लावता ग्राहकांना जागृतीपर संदेश द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी केले. राज्यभर सुरू असलेल्या ‘यशवंत ग्राहक जागृती’ अभियानांतर्गत येथे भुजबळ फार्म येथील कार्यालयात जिल्ह्यातील ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ग्राहक सल्ला व सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून केंद्राचे उद्घाटन समितीचे प्रदेशाध्यक्ष गवळी यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या हस्ते झाले.
या वेळी समितीच्या प्रदेश सरचिटणीस स्मिता नॉर्टन, न्याय व विधी प्रदेश सहप्रमुख लिना शेख, प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा खोपडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीची कार्यालये सर्वसामान्यांची आधार केंद्रे झाली पाहिजेत. ती शासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील दुवा असली पाहिजेत. ८० टक्के समाजकारण करण्यासाठी ग्राहक संरक्षण समिती हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रदेशाध्यक्ष गवळी यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे पक्ष घराघरात पोहोचविण्याचे काम होऊ शकते, मात्र त्यासाठी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडविल्या पाहिजेत, अशी सूचना अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केली. ग्राहकांवर अन्याय किंवा फसवणूक झाली तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीला धावले पाहिजे. प्रसंगी ग्राहक तक्रार न्याय मंचाकडे तक्रार दाखल करून न्याय मिळण्यासाठी सर्व सहकार्य केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. शहर कार्यकारिणीत महिला शहराध्यक्ष प्रीती सावंत, संपर्कप्रमुख सुरेश आव्हाड, महिला शहर संपर्कप्रमुख वैशाली बाविस्कर, सरचिटणीस सदाशिव नाईक, शहर संघटक विठ्ठल विभुते, कोषाध्यक्ष राधाकृष्ण नाईकवाडे, मध्य विभाग अध्यक्ष नासिर खान पठाण, सातपूर विभाग अध्यक्ष स्वप्निल दुसाने, शहर प्रवक्ता श्रीकांत दिघोळे यांचा समावेश आहे. नाशिक जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष अ‍ॅड. गीतांजली बागूल, अ‍ॅड. लीना देव, सरचिटणीस शीतल राजपूत, भाऊसाहेब आव्हाड, उपाध्यक्ष शेख रिझवान गनीभाई, तालुका अध्यक्ष चांदवड- अनिल पवार, अलका गांगुर्डे, नाशिक- रामकृष्ण झाडे, बागलाण- जितेंद्र पवार, दर्यासिंग पवार, जिल्हा संघटक- योगेंद्र नहिरे यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.