सर्वच क्षेत्रातील कंत्राटी व असंघटित कामगारांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सीटूप्रणित सर्व जनसंघटनांच्या वतीने बुधवार, २५ सप्टेंबरला मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्य़ाच्या सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सीटू संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात सीटू संघटनेतर्फे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, केंद्रातील युपीए सरकार व राज्यातील आघाडी सरकार गेल्या अनेक वर्षांंपासून सातत्याने कामगार विरोधी धोरणे राबवित आहे. केंद्र सरकार तर संपूर्णपणे कॉर्पोरेट लॉबीच्या हिताचेच निर्णय राबवित असून, त्यांच्या दबावाखाली कोटय़वधींच्या संख्येतील असंघटित कामगारांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
सर्वत्र कंत्राटीकरण व खासगीकरण बोकाळल्याने कामगारांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत आहे. असंघटित क्षेत्रातील कोटय़वधी कामगारांना सामाजिक सुरक्षा, पेशंन, विमा यासारख्या योजनांचा लाभ दिला जात नाही. ‘हायर अ‍ॅण्ड फायर’ नीतीमुळे लाखो कामगारांना बेरोजगार केले जात आहे. याविरोधात सीटूप्रणित कामगार संघटनांनी वारंवार आंदोलने करून आवाज उठविला आहे. याचाच एक भाग म्हणून सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी २५ सप्टेंबरला मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, लिंक वर्कर्स, बी.एस.एन.एल. कंत्राटी कामगार, जिजामाता साखर कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी, बांधकाम कामगार, घरकामगार, अंकुर सिडस् कामगार, या सर्व संघटनांच्या सभासदांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सीटूचे जिल्हा सचिव कॉ.पंजाबराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष कॉ.सुधाीर देशमुख, कॉ.राजन चौधरी, कॉ.अशोक लांडगे, कॉ.प्रदीप ठेंग, कॉ.अजय पवार, कॉ.सुधाकर जाधव, कुसूम चहाकर, जयश्री क्षीरसागर, माया मोटे, दुर्गा चव्हाण, मीरा तायडे, सरला मिश्रा, सौ. नेमाडे, राधिका भुसारी यांनी केले आहे.

Story img Loader