कोठी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे मोटारसायकलस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मागणी करणारा अर्ज आज सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गेंटय़ाल यांनी न्यायालयात दाखल केला. यासंदर्भात उपमहापौर गीतांजली काळे यांनी ठेकेदाराविरुद्ध असाच आक्षेप घेतला असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
गेंटय़ाल यांनी वकील शिवाजी सांगळे यांच्यामार्फत मुख्य न्यायादंडाधिका-याकडे हा अर्ज दाखल केला. गेल्या शनिवारी (दि. ३) सकाळी साडेसहा वाजता कोठी रस्त्यावरील, भाजी मार्केटजवळील सावता लॉजसमोर, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नामदेव मुरलीधर गायके या स्वारास जीपची धडक बसून मृत्यू झाला. या घटनेवरून गेंटय़ाल यांनी ही मागणी केली आहे.
हा अपघात केवळ मनपा कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करणे व तो रस्ता सुस्थितीत ठेवणे, रस्त्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास डागडुजी करण्याची जबाबदारी आयुक्त, उपायुक्त, बांधकाम अभियंता यांची आहे. त्यासाठीच त्यांची नेमणूक झाली आहे व त्यासाठी ते नागरिकांकडून कर रुपात पैसा जमा करतात, पगार घेतात. परंतु या अधिका-यांनी कायद्याने ठरवून दिलेले काम व्यवस्थित केले नाही. रस्त्याची निगा न ठेवून त्यांनी रस्त्यावरून जाणा-या लोकांचा विश्वासघात केला आहे. जनतेचे काम करत आहे, असे भासवून त्यांनी पगार घेऊन नियोजित पद्धतीने फसवणूक केली. या अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गायके यांचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला झालेली नोंद केवळ जुजबी कारवाईची आहे. आपण आयुक्त, उपायुक्त व बांधकाम अभियंता यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी कोतवाली पोलिसांकडे अर्ज दिला, परंतु त्यांनी फिर्याद दाखल करून घेण्यास नकार दिला, त्यामुळे आपण न्यायालयात मागणी करत आहोत, असे गेंटय़ाल यांनी अर्जात नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा