कळवण सटाणा मालेगाव देवळा (कसमादे) भागातील शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या नियोजित मांजरपाडा-२ प्रकल्पास शासनाने तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा सरचिटणीस वसंत निकम व मालेगाव तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. गोदावरी खोऱ्यासाठी असलेला मांजरपाडा-१ प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असताना गिरणा खोऱ्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या मांजरपाडा-२ प्रकल्पास विलंब होत असल्याबद्दल मुख्यंमत्र्यांना दिलेल्या निवेदनात खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
मांजरपाडा-१ आणि २ योजनांद्वारे सुरगाणा तालुक्यातील पश्चिम वाहिनी पार नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी अनुक्रमे गोदावरी व गिरणा खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे चार वर्षांपूर्वी सुरू झालेला मांजरपाडा-१ हा प्रकल्प पूर्णत्वाकडे असतांना मांजरपाडा-२ प्रकल्पास अद्याप प्रशासकीय मान्यता मिळू शकली नाही. मांजरपाडा-२ प्रकल्पासाठी जलविज्ञान प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ४४४.५१ कोटीचा प्रशासकीय मान्यता अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला. तसेच शासनास संयुक्त मोजणी अहवाल सादर करण्यात आला असतांना प्रकल्पास अद्याप अंतिम मान्यता मिळू शकली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मांजरपाडा-२ प्रकल्पातून ६३५ दशलक्ष घनफूट पाणी गिरणा खोऱ्यासाठी तर १०० दशलक्ष घनफूट पाणी स्थानिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. त्यातून सुरगाणा तालुक्यातील ३८० हेक्टर व गिरणा खोऱ्यातील १८८६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.या पाण्याचा चणकापूर धरणात साठा करण्यात येऊन ते चणकापूर उजवा व डाव्या कालव्याद्वारे मालेगाव, सटाणा, कळवण व देवळा तालुक्यास उपलब्ध होणार असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. शिवाय गेल्या दहा वर्षांत या चारही तालुक्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे.
वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. २८०० दलघफूसाठवण क्षमता असूनही पिण्याकरीता चणकापूर धरणाचे पाणी कमी पडू लागले आहे. त्याचमुळे ‘कसमादे’ भागातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची आवश्यक गरज म्हणून हा प्रकल्प होणे आवश्यक असल्याचे डॉ.शेवाळे, निकम व डॉ.ठाकरे यांनी या निवेदनात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा