चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी तीन प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर, शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेंद्र गड्डीन्नावर यांचे अर्ज दाखल झाले. आतापर्यंत पंधरा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून ६ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.     
विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील मान्यवरांसह मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, भरमू पाटील, नरसिंग पाटील, धनंजय महाडिक आदी या वेळी उपस्थित होते.     
    शिवसेनेचे उमेदवार शिंत्रे यांचा अर्जही मिरवणुकीने भरण्यात आला. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांचे प्रमुख, शिवसैनिक या वेळी उपस्थित होते. स्वाभिमानीचे गड्डीन्नावर यांनीही प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा