महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी अभय आगरकर (भाजप), विक्रम राठोड (शिवसेना), सुभाष लोंढे (काँग्रेस) आणि कैलास गिरवले, संजय घुले (दोघेही राष्ट्रवादी) यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. महापौर संग्राम जगताप यांनी या निवडींची घोषणा केली. स्थायी तसेच महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांच्याही निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या.
या सर्व निवडीसांठी आज मनपाची विशेष सभा बोलवण्यात आली होती. महापौर जगताप यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर शीला शिंदे, नगरसचिव मिलिंद वैद्य यावेळी उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील क्रमानुसार सुरुवातीला स्थायी समितीचे सोळा सदस्य निवडण्यात आले. मूल्यांकनानुसार मनपातील नोंदणीकृत पक्षांकडून ही नावे मागवण्यात आली होती. याच पध्दतीने महिला व बालकल्याण समितीचेही सोळा सदस्य निवडण्यात आले. स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारीच पक्षांच्या गटनेत्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यांची आयुक्तांनी कालच छाननी केली होती. वरीलप्रमाणे ही पाच नावे जगताप यांनी जाहीर केली.
सभेच्या सुरुवातीला दीप चव्हाण यांनी विषयपत्रिकेवरच विविध आक्षेप घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. सभेचा क्रमांक तसेच सभेची नगरसेवकांना पाठवण्यात आलेली टिप्पणी व सभेत वाचून दाखवण्यात आलेला प्रस्ताव यातील तफावतीवर बोट ठेवत चव्हाण यांनी हे आक्षेप उपस्थित केल्याने सुरुवातीला काही वेळ सभेत गरमागरम चर्चा झाली.
स्थायी समिती सदस्य
किशोर डागवाले (मनसे), नंदा साठे, दत्तात्रेय कावरे (दोघेही भाजप), सुनीता मुदगल, उमेश कवडे, सचिन जाधव, शारदा ढवण (चौघे शिवसेना), शेख फैय्याज, सुनीता कांबळे, दीप चव्हाण (तिघे काँग्रेस), संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बोराटे, विजया दिघे, कुमार वाकळे (पाचही राष्ट्रवादी), उषा ठाणगे (अपक्ष).
महिला व बालकल्याण समिती
मीना बोज्जा (मनसे), मालतीताई ढोणे, उषा नलावडे (दोघी भाजप), रूपाली वारे, जयश्री सोनवणे, सविता कराळे (तिघी काँग्रेस), दीपाली बारस्कर, छाया तिवारी, सुनीता फुलसौंदर, विद्या खैरे (चौघी शिवसेना), सुनीता भिंगारदिवे, इंदरकौर गंभीर, कलावती शेळके, मंगला गुंदेचा, ख्वाजा कुरेशी (सर्व राष्ट्रवादी), नसीम शेख खानसाहेब (अपक्ष).
ठाणगे यांना स्थायी समिती?
मनपात दोन्ही काँग्रेसची सत्ता असली तरी महत्त्वाच्या स्थायी समितीचे सभापतिपद भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक उषा ठाणगे यांना देण्याचे निश्चित झाल्याचे समजते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळची ही तडजोड असल्याचे सांगण्यात येते. या पदासाठी त्याचवेळी श्रीमती ठाणगे यांना सभापतिपदासाठी आश्वस्त करण्यात आले होते असे समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा