खुनाच्या गुन्हय़ात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संतोष बांगरच्या गळय़ात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची माळ घातली गेल्याने जिल्हय़ाच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारेसह नाराज पदाधिकारी या मुद्यासाठी मंगळवारी मुंबई येथे जाणार असून उद्धव ठाकरेंच्या कानी बांगर यांचे प्रकरण घातले जाईल, असे रविवारी सांगण्यात आले.
हिंगोली तालुक्यातील पारडा या गावात २००७ साली विठ्ठलप्पा तुकारामप्पा तोरकर या पंचाहत्तर वर्षांच्या व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने संतोष बांगर व त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्यासह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेने बांगर यास जिल्हाप्रमुखपदावरून हटविले होते. ९ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेनंतर हे पद रिक्तच होते. या पदावर वर्णी लागावी म्हणून दिनकर देशमुख, कुडाजी भवर, सुनील काळे, अशोक नाईक प्रयत्नशील होते. माजी आमदार गजानन घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी व्यूहरचनाही केली होती. तथापि खासदार सुभाष वानखेडे यांनी संतोष बांगर यांनाच जिल्हाप्रमुख केले जावे, यासाठी आग्रह धरला. शनिवारी त्यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी गांधी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या नव्या नियुक्तीमुळे नाराज शिवसैनिक मुंबईला जाणार असून, जिल्हाप्रमुखपद अन्य व्यक्तीला दिले गेले नाही तरी जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्यासह काही कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेत गटबाजीला उधाण आले आहे.