जुन्या इमारतीचे नवीन बोगस रेकॉर्ड तयार करून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतील ६ लाख ५ हजार रुपये रकमेचा अपहार केला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या डॉ. अंजली दमानिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायण पोवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली. गड मुडशिंगी (ता. करवीर) येथे सर्वे नंबर ४४९ मधील ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर सन २००५ मध्ये तत्कालीन आमदार दिग्विजय खानविलकर व खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या फंडातून माळी समाजासाठी सांस्कृतिक सभागृह व व्यायामशाळेचे बांधकाम केले आहे.
तेव्हापासून या इमारतीचा वापर नागरिक करीत आहेत. असे असतानाही याच जागेवर नवीन बांधकाम केले असे बोगस कागदपत्र  तयार करून ६ लाख ५ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. जुन्या इमारतीच्या कोनशिला बदलून त्या जागी नवी कोनशिला बसवून त्याचे छायाचित्र काढून खोटय़ा नोंदी तयार करण्यात आल्या आहेत.    
विवक्षित ठिकाणी पूर्वीच इमारत बांधलेली असताना जिल्हा नियोजन समितीने या कामावर नव्याने पैसे खर्च करण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करून दमानिया म्हणाल्या, या ठिकाणी सन २०११ रोजी सतेज पाटील यांच्या फंडातून माळी समाजासाठी सांस्कृतिक सभागृह व व्यायामशाळेचे बांधकाम केले असेल तर खानविलकर व मंडलिक यांच्या फंडातून बांधलेले सांस्कृतिक सभागृह व व्यायामशाळा कोठे गेली याचा शोध शासकीय यंत्रणेने घेतला पाहिजे.     
विशेष म्हणजे २००५ साली दोन्ही सभागृहाचे उद्घाटन खानविलकर व मंडलिक यांनी केले होते. त्याच इमारतीला फक्त कोनशिला बदलून मंडलिक व सतेज पाटील यांनी २८ सप्टेंबर २०१० रोजी उद्घाटन केले असल्याच्या आशयाची कोनशिला बसविण्यात आली आहे. तथापि या कामाला तांत्रिक मान्यता पुढच्या वर्षांत म्हणजे २९ ऑक्टोबर २०११ रोजी मिळालेली आहे. तांत्रिक मान्यता मिळण्यापूर्वीच सभागृह बांधले गेलेले आहे. इतके सर्व बोगस घडत असताना शासकीय यंत्रणा काय करीत होती असा प्रश्न उपस्थित करून या अपहार प्रकरणाची चौकशी शासकीय यंत्रणेने करावी. या प्रकरणाचा पाठपुरावा आम आदमी पक्षाच्या वतीने केला जाणार आहे, असेही दमानिया यांनी सांगितले. यावेळी संजय साने, सुभाष वारे, पद्माकर कापसे उपस्थित होते.

Story img Loader