स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांमधून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवून आपल्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या नियमित वर्गाच्या वेळा मनमानीपणे बदलण्याचे चुकीचे पायंडे महाविद्यालयांमध्ये पडत आहेत. सध्या या प्रकाराची झळ मालाडमधील मुलींच्या ‘टी. एस. बाफना कनिष्ठ महाविद्यालया’त शिकणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थिनींना बसते आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या वाणिज्य शाखेच्या वर्गाची वेळ बदलून ६.३०वरून ७.४५ पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, हे नियमित महाविद्यालय म्हणायचे की रात्र महाविद्यालय असा प्रश्न विद्यार्थी-शिक्षकांना पडला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इतक्या उशीरापर्यंत वर्गात थांबण्यास विद्यार्थिनी तयार नाहीत. त्यामुळे, या मुलींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. परिणामी या गैरसोयीच्या वेळांविषयी विद्यार्थिनींमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयाचे पदवीचे वर्ग एसएनडीटीशी संलग्नित आहे. महाविद्यालयात बहुतांश गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली शिकतात. पण, गेली दोन वर्षे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेळा मनमानीपणे बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुटणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग ७.१५पर्यंत लांबविण्यात आले. आता यावर कडी म्हणून पुढील शैक्षणिक वर्षांपासून वाणिज्य शाखेचा शेवटचा तास ७.४५पर्यंत संपविण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे येथे शिकणाऱ्या तब्बल दोन हजार मुलींची मोठी गैरसोय होणार आहे.
‘आमच्या येथे अनेक मुली नालासोपारा, विरार, वसई या भागातून शिकण्यासाठी येतात. बऱ्याच मुली आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या आहेत. परंतु, बसचे भाडे परवडत नसल्याने अनेकजणी महाविद्यालय ते घर असा प्रवास चालतच करतात. अशा मुली अंधार पडला की सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या तासाला थांबायला तयार होत नाही. त्यामुळे, शेवटच्या तासाला आत्ताच फार तुरळक उपस्थिती असते. परिणामी ६.३० वाजले की महाविद्यालयात चिटपाखरूही दिसत नाही,’ अशी प्रतिक्रिया येथे शिकविणाऱ्या एका शिक्षकाने दिली. ‘कनिष्ठ महाविद्यालये ५.३० किंवा फारतर ६.३०पर्यंत चालविली जातात. पण, आपल्या स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना वर्ग उपलब्ध करून देण्याकरिता महाविद्यालय आपल्या इतर अनुदानित वर्गाच्या वेळांमध्ये मनमानीपणे बदल करते आहे,’ अशी माहिती एका शिक्षकाने पुरविली. तर ‘शेवटच्या तासाची वेळ सायंकाळी ७.४५ पर्यंत नेल्यास आम्हाला शेवटचे दोन्ही तास बुडविण्याशिवाय पर्याय नाही,’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली. या संदर्भात महाविद्यालयाच्या कुलसचिव दक्षा त्रिवेदी यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ न शकल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पैसे कमाविण्यासाठी महाविद्यालयाची मनमानी
स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांमधून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवून आपल्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखांच्या नियमित वर्गाच्या वेळा मनमानीपणे बदलण्याचे चुकीचे पायंडे महाविद्यालयांमध्ये पडत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2014 at 07:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbitrariness of college for money