ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचे लोकमान्य टिळक इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर अॅन्ड डिझाइन स्टडीज या महाविद्यालयाचे विद्यार्थी उद्यापासून सर्वेक्षण करणार आहेत. या मार्गावरील वाहतूक कोंडीची कारणे आणि त्यावरील उपाययोजना हा या सर्वेक्षणाचा विषय असून हे सर्वेक्षण नंतर विद्यार्थी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पालिकेला देणार आहेत. या सर्वेक्षणामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर काही उपाययोजना पालिकेला करणे शक्य होणार आहे.
नवी मुंबईतून पुणे-गोवा महामार्गाकडे जाणारा ठाणे-बेलापूर मार्ग हा दिवसेंदिवस बिकट होत आहे. सध्या दिवसाला एक लाख वाहने या मार्गावर ये-जा करीत आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यावर पालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून या मार्गाची पुनर्रचना व काँक्रीटीकरण केले खरे, पण या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या रस्त्याची पुनर्बांधणी करताना पालिकेने समांतर सव्र्हिस रोडची बांधणी न केल्याने शहराच्या कानाकोपऱ्यात जाणारी वाहनेदेखील याच रस्त्याचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळीदेखील आता वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत, पण ते उपाय अल्पजीवी ठरत आहेत. त्यामुळे वाशी येथील लोकमान्य टिळक इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर अॅन्ड डिझाइन स्टडीज महािवद्यालयाचे संचालक जगदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालययाचे ८० विद्यार्थी शुक्रवारपासून या मार्गाचे सर्वेक्षण करणार आहेत. पाच-पाच जणांचे विभाग करून हे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील या विद्यार्थ्यांंना सहकार्य करीत आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीची काही बेटे तयार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुर्भे, महापे, घणसोली आणि रबाले हे जंक्शन त्रासदायक ठरू पाहत आहेत. तुर्भे येथे तुर्भेनाका आणि तुर्भे स्टोअर ही प्रमुख ठिकाणे आहेत. तुर्भे येथे उड्डाण पूल बांधूनही हा प्रश्न सुटलेला नाही.
हा उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. महापे येथे तीन बाजूने मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या वाहनांना हवा तसा मार्ग मोकळा नाही. एमआयडीसीतून येणारी वाहने दिवसेंदिवस वाढत आहेत, पण त्यांच्यासाठी कमी सेकंदाचा सिग्नल ठेवण्यात आला आहे.
या मार्गावरचा सिग्नल-वेळ वाढविल्यास ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याचे दिसून येते. या सिग्नलच्या बेलापूर बाजूला महापे मिलिनियम पार्कमध्ये ठेवण्यात आलेले वळण या मार्गावरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. या उड्डाण पुलावर बांधण्यात आलेला पादचारी पूल पादचाऱ्यांच्या कामाचा नाही असे दिसून येते. कारण या पुलाची एक बाजू रेल्वे रुळाच्या कोपरखैरणे बाजूस काढण्यात आली आहे. तिचा वापर पादचारी करताना दिसत नाही. घणसोली येथे गावात जाणारे वळण आणि रिलायन्सच्या वाहनांसाठी खासकरून ठेवण्यात आलेला रस्ता हा सकाळ-संध्याकाळ या मार्गावर लांबच लांब रांगा करण्यास कारणीभूत ठरत आहे. पुढे रबाले उड्डाण पुलाची उभारणी योग्य पद्धतीने न झाल्याने त्या ठिकाणी बॉटल नेक तयार होत आहेत.
या सर्व समस्यांची पाहणी देसाई यांनी पाटील यांच्यासोबत दोन दिवसापूर्वी केली आहे. देसाई मुंबईतील फोरम फॉर इप्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाइफ मुंबई या संस्थेचे संस्थापक-विश्वस्त आहेत. नवी मुंबईतील ही समस्या हळुवारपणे सोडविता यावी यासाठी ते वाहतूक विभागासाठी एक अहवाल तयार करणार आहेत. या संदर्भात नागरिकांच्याही काही सूचना असल्यास त्यांनी नवी मुंबई वाहतूक उपायुक्त कार्यालयात कळवाव्यात, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचे वास्तुशास्त्र विद्यार्थी सर्वेक्षण करणार
ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचे लोकमान्य टिळक इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर अॅन्ड डिझाइन स्टडीज या महाविद्यालयाचे विद्यार्थी उद्यापासून सर्वेक्षण करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-02-2013 at 03:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Architect student will survey of traffic jam on thane belapur route