बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते व अशोक सावंत यांच्यात निघोज येथील जाहीर कार्यक्रमात गुरुवारी जोरदार खडाजंगी झाली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्यासमोर रंगलेल्या या कलगीतु-याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
सोमनाथ वरखडे व उमेश सोनवणे यांच्या पुढाकारातून निघोजमधील युवकांनी खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात दाते व सावंत यांच्यात खडाजंगी झाली. कार्यक्रमाचे आयोजन करताना माजी उपसभापती खंडू भुकन यांना विश्वासात न घेतल्याच्या रोषातून आशोक सावंत यांनी काशिनाथ दाते यांच्यावर आपल्या भाषणातून शरसंधान केले, तेथून दोघांमधील वादाला सुरुवात झाली.
सावंत म्हणाले, भुकन यांनी नाराज होण्याचे कारण नाही, आपण पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते आहोत. अनेकांना पक्षातर्फे आमदारकी, खासदारकी लढवायची आहे. उमेदवारीसाठी मीही इच्छुक आहे, याची इतरांनी जाणीव ठेवावी असा टोला सावंत यांनी दाते यांचे नाव न घेता लगावला. दादा कळमकर यांना उद्देशून सावंत म्हणाले, शरद पवारांशी तुमचे सख्य आहे. पक्षावर, पवारांवर कोणी टीका केल्यास त्याविरोधात मी व सुजित रस्त्यावर उतरतो हे तुम्ही त्यांच्या कानावर घाला. अशा वेळी पक्षात नव्याने आलेले कोठे असतात असा सवालही त्यांनी केला. सुजित झावरे यांनीही सावंत यांच्या सुरात सूर मिळवून आकांडतांडव करून आमदारकी, खासदारकी मिळत नसते ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ती संधी मिळेल असे सांगत दाते यांना चिमटा काढला.
दाते यांनीही आपल्या भाषणातून सावंत यांना सडेतोड उत्तर दिले. जुन्या-नव्याचा वाद काढू नका, पारनेरच्या बाजारतळावरच अजित पवार यांनी असा वाद करणा-यांना फटकारल्याचे विसरलात का, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, ज्यांचे तालुक्याशी देणे घेणे नाही, ज्यांचा सर्वाधिक वेळ मंत्रालयातच जातो त्यांनी तालुक्यात येऊन भांडणे लावण्याचे उद्योग करू नयेत. आम्ही स्थापनेपासून पक्षाबरोबर आहोत. वसंतरावांना आमदार करण्यात आमचेही मोठे योगदान आहे. मध्यंतरी वेगळ्या कारणामुळे पक्षाबाहेर गेलो होतो. मात्र आम्ही जेथे राहतो तेथे निष्ठेनेच काम करतो. राष्ट्रवादीच्या नावाने मिरवायचे, निवडणुकीत मात्र विरोधात काम करण्याचा काहींचा धंदाच झाला असल्याचे सांगत त्यांनीही सावंत यांना चांगलेच फटकारले. दाते तालुकाध्यक्ष पोपटराव पवार यांच्यावरही घसरले. निवडीनंतर एकही बैठक बोलविण्यात आली नाही, असे काम सुरू ठेवले तर पक्ष कसा वाढणार असा सवाल त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा