राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये विविध पदके मिळवून देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंपैकी केवळ अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंना रेल्वेने राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेससह (दुरांतो एक्स्प्रेस वगळून) सर्व गाडय़ांतून मोफत प्रवास करण्याची सन्मानिका दिली आहे. ऑलिम्पिक पदके मिळविलेल्या किंवा अन्य स्पर्धामध्ये सुवर्णपदके मिळविणाऱ्या खेळाडूंना मात्र मेल-एक्स्प्रेस गाडय़ांतून जीवनभर मोफत प्रवासाची परवानगी असल्याच्या कारणास्तव ही सुविधा नाकारण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाच्या वतीने विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यांना अनेक सुविधाही दिल्या जातात. या सुविधा देण्यामागे त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे हा भाव असतोच, पण त्यांना अधिक सुविधा दिल्याने ते आणखी चमकदार कामगिरी करतील, अशीही अपेक्षा व्यक्त होत असते. असे देशाचे पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये काही ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धेतील पदक विजेते असतात. काही त्यांचे शिक्षक असतात, ज्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केलेले असते. या सर्वाना प्रवासाची सुविधा देणे अपेक्षित असते, पण रेल्वे मंत्रालयाने त्यामध्ये दुजाभाव केला आहे. केवळ अर्जुन पुरस्कार विजेत्यांनाच राजधानी एक्स्प्रेसच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वातानुकूलित वर्गातून किंवा शताब्दी एक्स्प्रेसच्या चेअरकारमधून त्याचप्रमाणे मेल, एक्स्प्रेसच्या प्रथम वर्ग किंवा द्वितीय वातानुकूलित वर्गातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे; तथापि यामध्ये दुरान्तो एक्स्प्रेसचा समावेश नाही. ६५ वर्षांपुढील अर्जुन पुरस्कार विजेत्यास एक सहकारी सोबत नेण्याची परवानगी आहे. ऑलिम्पिक पदक विजेते, राष्ट्रकुल किंवा आशियाई सुवर्णपदक विजेत्यांना, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त खेळ शिक्षकांना रेल्वेने यापूर्वीच आयुष्यभर रेल्वे प्रवास मोफत करण्याची सुविधा दिली असली तरी ती राजधानी, शताब्दी, दुरांतो, मेट्रो किंवा कोलकाता रेल्वेमध्ये नाही. याचा अर्थ केवळ अर्जुन पुरस्कार विजेत्यांनाच खऱ्या अर्थाने संपूर्ण रेल्वे प्रवास मोफत करण्याची सुविधा मिळाली आहे.
केवळ ‘अर्जुन’ विजेत्यांनाच राजधानी, शताब्दीमधून मोफत प्रवास
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये विविध पदके मिळवून देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंपैकी केवळ अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंना रेल्वेने राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेससह (दुरांतो एक्स्प्रेस वगळून) सर्व गाडय़ांतून मोफत प्रवास करण्याची सन्मानिका दिली आहे.
First published on: 08-09-2012 at 03:43 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun award indian railway sports olympics