स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस स्फोटानंतर आग लागून जलसमाधी मिळालेली ‘आयएनएस सिंधुरक्षक’ ही पाणबुडी नौदल गोदीतील धक्क्यालगतच गाळात रुतली असून ती बाहेर काढण्यासाठी तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सध्या वाटाघाटी सुरू आहेत. त्या संदर्भातील निर्णय कोणत्याही क्षणी अपेक्षित आहे, अशी माहिती नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयाचे प्रमुख कमांडिंग अधिकारी व्हाइस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी दिली.
सिन्हा यांनी सिंधुरक्षक दुर्घटनेनंतरचा संपूर्ण घटनाक्रम विशद केला. दुर्घटनेनंतर सर्वप्रथम सिंधुरक्षकवरील नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यात आला. कुटुंबियांना पूर्ण मदत मिळेल हे पाहण्यात आले. त्याचवेळेस बचाव कार्यात असे लक्षात आले की, स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले होते. त्यात पाण्यात उतरणे शक्य नव्हते. चिखलमिश्रीत पाण्यामुळे अडथळे येणार याची कल्पना आली. त्यामुळे लगेचच पाणबुडय़ांना याच वर्गातील दुसऱ्या पाणबुडीत सरावासाठी नेण्यात आले. पाण्यात दृश्यमानता कमी असणार, असे लक्षात आल्याने आत नेल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यांवर पट्टय़ा बांधून त्यांच्याकडून पाणबुडीत वावरण्याचा सराव करून घेण्यात आला.
दरम्यान, पाण्याचे तापमान कमी झाल्यानंतर ते प्रत्यक्ष सिंधुरक्षकमध्ये उतरले. या बचाव कार्यात एकूण ११ जणांच्या मृतदेहांचे अवशेष हाती लागले. कुटुंबियांच्या डीएनए चाचणीवरून त्यांची नामनिश्चिती करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत मिळावी आणि सारे नौदलाच्या इतमामात पार पडावे यासाठी युद्ध कारवायांतील जखमी व शहिदांसाठी वापरण्यात येणारे कायद्याचे कलम या घटनेसाठी वापरण्यात आले. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतही तातडीने मिळाली आणि अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडले. जे नौसैनिक घरातील एकमेव कमावते होते त्यांच्या घरातील इतर कुणाला नौदलाच्या सेवेत सामावून घेता येईल काय, याची चाचपणी सध्या सुरू आहे, अशी माहिती सिन्हा यांनी दिली.
दरम्यान, सागरतळ गाठलेली सिंधुरक्षक जोपर्यंत बाहेर काढली जाणार नाही. त्यातील अवशेषांचे रासायनिक विश्लेषण होणार नाही, तज्ज्ञ आतमध्ये जाऊन पाहाणी करणार नाहीत तोवर त्या दुर्घटनेचे नेमके कारणही कळणार नाही. म्हणूनच तिला बाहेर काढण्यासाठीची प्रक्रियाही वेगात सुरू करण्यात आली. अशाप्रकारे बुडलेली पाणबुडी बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान फारच कमी देशांकडे उपलब्ध आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली. पाच कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यातील तीन कंपन्या असे काम करू शकतात, असे नौदलाच्या तज्ज्ञ समितीच्या लक्षात आले. कंपन्यांच्या तज्ज्ञांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळेस त्यांचे पाणबुडेही सोबत होते. अखेरीस किंमतीसंदर्भातील त्यांच्या निविदा उघडण्यात आल्या. आता या तिन्ही कंपन्यांशी किंमतीच्या संदर्भातील अंतिम वाटाघाटी तज्ज्ञ समितीतर्फे दिल्लीत गेले तीन दिवस सुरू असून कोणत्याही क्षणी निर्णय अपेक्षित आहे, असे सिन्हा म्हणाले.
सिंधुरक्षकच्या दुर्घटनेनंतर पाणबुडय़ांवर बसविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या संदर्भात काही शंका व्यक्त करण्यात आल्या. म्हणून त्यानंतर तातडीने आपल्या पाणबुडय़ांच्या सर्व व्यवस्थांची सविस्तर पाहणी करण्यात आली. त्यात त्या सर्व सक्षम आणि समर्थ असल्याचे लक्षात आले, असेही व्हाइस अॅडमिरल सिन्हा म्हणाले. पाणबुडीच्या संदर्भात जगभरात असे एकूण ११ अपघात झाले असून रशियातील पाणबुडीच्या अपघातात तर १११ जणांना प्राण गमवावे लागले होते. सिंधुरक्षकवरील काही नौसैनिकांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यामुळे आजही सागरतळाला असलेल्या पाणबुडीत चांगले पाणी सोडून त्या मृतदेहांचा शोध दररोज घेतला जातो, असेही ते एका उत्तरात म्हणाले.
‘सिंधुरक्षक’ बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी वाटाघाटी सुरू
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस स्फोटानंतर आग लागून जलसमाधी मिळालेली ‘आयएनएस सिंधुरक्षक’ ही पाणबुडी नौदल गोदीतील धक्क्यालगतच गाळात रुतली असून ती बाहेर काढण्यासाठी तीन आंतरराष्ट्रीय
First published on: 05-12-2013 at 08:49 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Around rs 500 crore to be spent on ins sindhurakshak salvage operation