माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या जळीत प्रकरणात अडकलेले सदाशिव नगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना माळशिरसच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करीत दिलासा दिला आहे.
गेल्या १६ ऑगस्ट रोजी वेळापूर येथे खरेदी केलेली शेतजमीन ताब्यात घेण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात सदर शेतजमिनीवर वहिवाटीचा दावा करणारे अशोक विठ्ठल पवार, त्यांचे वडील विठ्ठल पवार व आई पारुबाई पवार या तिघांवर २० ते २५ जणांच्या जमावाने हल्ला करुन पेट्रोल व रॉकेल ओतून पेटवून दिले होते. याप्रकरणी आतापर्यंत
सात जणांना वेळापूर पोलिसांनी अटक केली असून हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तथापि, मूळ फिर्याद दिल्यानंतर अशोक पवार यांनी काही दिवसांनी पुरवणी जबाब देऊन त्यात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी चिथावणी दिल्यामुळेच हे जळीत प्रकरण घडल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार प्रकरणात मोहिते-पाटील यांना आरोपी करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस सत्र न्यायालयात धाव घेऊन अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला असतानाच जखमी अशोक पवार यांचा ३ सप्टेंबर रोजी पुण्यातील रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. या पाश्र्वभूमीवर माळशिरसचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरुटे यांच्यासमोर शुक्रवारी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन कायम केला. तत्पूर्वी, अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीप्रसंगी मोहिते-पाटील यांच्यावतीने अॅड. विराज काकडे यांनी युक्तिवाद करुन आक्षेपार्ह मुद्दे उपस्थित केले. जळीत घटनेचे चित्रीकरण उपलब्ध असून ही चित्रफीत पोलीस तपास यंत्रणेकडे सादर करण्यात आली आहे. ही चित्रफीत सरकार पक्षाने अमान्य केली नाही. जळीत घटनेनंतर दिलेल्या मूळ फिर्यादीत व काही दिवसानंतर दिलेल्या पुरवणी जबाबात मोठी तफावत आहे. यात धवलसिंह मेहिते-पाटील यांना खोटेपणाने गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा युक्तिवाद अॅड. काकडे यांनी केला. त्यांना अॅड. हेमंत चव्हाण, अॅड. दिलीप फडे, अॅड. रणजित जगताप यांनी साह्य केले. सरकारतर्फे अॅड. ए. डी. भोसले तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. गणेश करमाळकर यांनी बाजू मांडली.
धवलसिंह मोहिते यांना अटकपूर्व जामीन मंजूर
माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या जळीत प्रकरणात अडकलेले सदाशिव नगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना माळशिरसच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करीत दिलासा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest before bail sanction to dhawal singh mohite