शिवसेनाप्रमुखांवर कारवाई म्हटले की, मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण व्हायचे. त्याचे कारण होते १९६९ ची मुंबईतील दंगल. शिवसेनेच्या इतिहासातील हे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण. फेब्रुवारी १९६९ मध्ये शिवसेनेने सीमाप्रश्नाचे रणशिंग फुंकले. केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत प्रवेश बंद करू, अशी भूमिका बाळासाहेबांनी जाहीर केली होती. त्यानंतर उपपंतप्रधान मोरारजी देसाई हे सांताक्रूझ विमानतळावरून मलबार हिलच्या दिशेने जाणार होते. भरपूर बंदोबस्त असताना शिवसैनिक माहीम ते वरळी दरम्यान उभे होते. मोरारजींची गाडी आंदोलकांना न जुमानता तशीच निघून जाऊ लागताच, दगडफेक सुरू झाली. लोक गाडीपुढे आडवे आले. पोलिसांनी मोरारजींची गाडी गर्दीतून बाहेर काढली खरी पण मग संतप्त शिवसैनिकांचा राग उडप्यांची हॉटेले, दुकाने यांच्यावर निघायला सुरुवात झाली. या तणावाच्या वातावरणातच शिवसेनेने परळच्या भोईवाडा मैदानात बंदी हुकूम मोडून जाहीर सभा जाहीर केली. त्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारल्याने वातावरण चिघळले.
रविवार नऊ फेब्रुवारी रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी यांना प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली ताब्यात घेण्याचे आदेश दिले. घर, हॉटेल, दुकाने, वाहने, पोलिसांवर हल्ले सुरू झाले. हा आगडोंब आवरणे अशक्य झाले तेव्हा त्या दिवशी सायंकाळी दादर परिसरात संचारबंदी लागू झाली. दंगलखोरांवर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ही दंगल पाहून राज्य सरकारने येरवडय़ाच्या तुरुंगात असलेल्या बाळासाहेबांकडून ‘शांततेचे आवाहन’ लिहून घेतले. मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात आले. तरी लोक ऐकायला तयार नव्हते. सुमारे चार दिवस-रात्र दादर व अवतीभवतीचा परिसर पेटला होता. ५० हून अधिक लोक या दंगलीत मृत्युमुखी पडले. पोलिस दलातील १५१ जखमी झाले. सुमारे ३२७८ लोकांना अटक करण्यात आली. सुमारे पाच कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, अशी माहिती तत्कालीन उपमंत्री कल्याणराव पाटील यांनी विधानसभेत दिली होती.
शिवसेनेचा प्रभाव दादर-लालबाग-परळ या परिसराबाहेर फार नव्हता तेव्हा इतकी मोठी दंगल पेटली. या ‘क्षमते’च्या जोरावरच शिवसेनेने पुढील लढाया जिंकल्या. १९६९ च्या या दंगलीनंतर बाळासाहेबांवर कारवाई हा नुसता विचार जरी पुढे आला तरी मुंबईसह राज्यात तणाव पसरायचा आणि संभाव्य परिणामांच्या नुसत्या कल्पनेनेच राज्यकर्त्यांना तो सोडून द्यावा लागायचा.
१९६९ मधील अटक
शिवसेनाप्रमुखांवर कारवाई म्हटले की, मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण व्हायचे. त्याचे कारण होते १९६९ ची मुंबईतील दंगल. शिवसेनेच्या इतिहासातील हे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-11-2012 at 01:26 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest in