जुने वैमनस्य, वर्चस्वाच्या लढाईतून घटना
हसनबागमधील गफ्फारअलीच्या हत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी मध्यरात्रीनंतर उशिरा तीन प्रमुख आरोपींना सापळा रचून अटक केली. जुने वैमनस्य आणि वर्चस्वाच्या लढाईतून कालची घटना घडली असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सध्या कारागृहात असलेला कुख्यात आरोपी समशेरअली रमजानअली याचा भाऊ गफ्फारअली याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर हसनबागमध्ये खळबळ उडाली. हसनबागमधील बडी मशिदीमागील संशयित आरोपींच्या घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले. रात्री उशिरा तेथे गफ्फारचे कुटुंबीय तसेच समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यातही त्याचे समर्थक गेले होते. आरोपींना पोलीस संरक्षण दिले जात असल्याचा त्यांचा आरोप होता. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. काल सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. गुन्हेगारी जगतातील खबऱ्यांना कामी लावण्यात आले. त्यातून संशयितांपैकी तिघांच्या नावांची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी युक्तीने सापळा रचला. या घटनेतील मुख्य आरोपी अलीमखान तसलीमखान, कलीमखान तसलीमखान व महेफुज अहमद कबुल हसन हे तीन मुख्य आरोपी सापळ्यात अडकले. या तिघांनाही मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली.
या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यातील इब्राहिमच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली. महेफुजने गोळीबार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यातील आणखी एक आरोपी फरार आहे. एका काळ्या, लठ्ठ व ठेंगण्या मारेकऱ्याने गफ्फारवर आधी तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक छाती तर दोन शरीरावर लागल्या. मारेकऱ्यांनी गोळीबार केल्यानंतर गफ्फारसोबत असलेला एकजण मारेकऱ्याच्या मागे धावला. ते पाहून दुसऱ्या मारेकऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. गफ्फारचा एक विश्वासू साथीदार पळून जात असताना त्याच्यावरही मारेकऱ्यांनी गोळीबार केला, मात्र तो बचावला.
जुने वैमनस्य तसेच वर्चस्वाच्या लढाईतून कालची घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. १९८० ते ९० दरम्यान संगम टॉकीजममध्ये तिकिटांच्या काळाबाजारातून दोन गट निर्माण झाले. त्यात वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात एका गेटकीपरचा खून झाला. हा खून करणाऱ्या टोळीचा प्रमुख असलेल्या एका पहेलवानाला बब्बू काल्या याने संपविले. हा वर्चस्वाचा खेळ सुरू झाला. बब्बू व त्याचा भाऊ समशेर या दोघांनी टोळी तयार करून एक-दोघांना संपविल्यानंतर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले. शहराच्या पूर्व भागात त्यांचे पूर्ण वर्चस्व असले तरी इतर भागात त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाले. त्यातच बब्बू काल्याला याच परिसरातील एकाने संपविले आणि समशेरला हादरे देणे सुरू झाले. जरीपटक्यातील बबलू फ्रान्सिसने समशेरवर केलेल्या
प्राणघातक हल्ल्यात समशेर बचावला तरी त्याचा दरारा
संपल्यागत झाला. मात्र, गफ्फारच्या सहाय्याने तो वर्चस्व निर्माण करू पाहत होता.
इतर गुन्हेगारांप्रमाणे समशेरने जमिनी बळकावणे सुरू केले. समशेरने पंधरा-वीस वर्षांपूर्वी वाठोडा परिसरातील एक मोठी जमीन ताब्यात घेतली होती. ती जागा महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रासाठी राखीव झाली. समशेरला काहीजण भेटले आणि ती जमीन त्याच्या नावे करून देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी ती जमीन हडपली. हसनबागमध्ये राहणारे अलीम व कलीम हे दोघे भाऊ समशेरचे साथीदार. गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशाच्या वाटणीतून त्यांचे बिनसले. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. अलीम व कमील या दोघांनी वर्चस्वासाठी टोळी तयार केली. अगदी उत्तर-प्रदेश, बिहार वगैरे परप्रांतात त्यांनी अवैध धंद्यांचे नेटवर्क तयार केले. ३० मार्चला दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर हल्ले केले. त्यानंतर वर्चस्वासाठी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरूच होते. समशेर कारागृहात आणि गफ्फार एकटा बसला असल्याची संधी अलीम-कलीमने साधली. कालच्या घटनेत वापरलेले पिस्तूल त्याने परप्रांतातून आणले असल्याची दाट शंका पोलिसांना आहे.
गफ्फारअली हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक
हसनबागमधील गफ्फारअलीच्या हत्येप्रकरणी नंदनवन पोलिसांनी मध्यरात्रीनंतर उशिरा तीन प्रमुख आरोपींना सापळा रचून अटक केली.
First published on: 27-02-2014 at 10:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to three for murdered case