जाफरनगरातील रसूल प्राथमिक शाळा जबरदस्तीने ताब्यात घेऊन ताबा सोडण्यासाठी दहा लाखाची खंडणी मागणाऱ्यांपैकी दोन आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.  अफसर खान रशीद खान, अमजद खान रशीद खान, वसीम खान रशीद खान, अजहर खान रशीद खान (सर्व रा. गंगानगर झोपडपट्टी) या चार आरोपींनी जाफरनगरातल्या टीचर्स कॉलनीतील रसूल प्राथमिक शाळा जबरदस्तीने ताब्यात घेतली. शाळेतील टेबल, खुर्ची, आलमारी, लाकडी बाक व इतर शैक्षणिक साहित्य, असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हे समजताच समसून गौस निस्या मोहम्मद इस्माईल पठाण (रा. हिवरी लेआऊट) व त्यांच्या कुटुंबीयांनी शाळा गाठली. शाळेत प्रवेश केल्यास जीवानिशी ठार मारण्याची तसेच शाळेचा ताबा हवा असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली.
या प्रकरणी पठाण यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अफसर खान रशीद खान, अमजद खान रशीद खान, वसीम खान रशीद खान, अजहर खान रशीद खान (सर्व रा. गंगानगर झोपडपट्टी) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपी वसीम खान रशीद खान, अजहर खान रशीद खान यांना अटक केली.
घर बळकाविल्याप्रकरणी गुन्हा
घरावर अतिक्रमण करून घर बळकाविल्याप्रकरणी कुख्यात आरोपी दिलीप ग्वालवंशी व त्याच्या साथीदारांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मनोहर महादेव देवूळकर यांनी गोरेवाडा परिसरातील गरीब नवाज सोसायटीत घर बांधले व तेथे रहावयास गेले. २२ डिसेंबर २००६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दिलीप ग्वालवंशी तीन- चार साथीदारांसह तेथे आला आणि त्याने जबरदस्तीने घरावर अतिक्रमण केले. अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या दहशतीमुळे हे कुटुंब प्रचंड घाबरलेले होते. या प्रकरणाची तक्रार त्यांनी ४ फेब्रुवारी २०१३ रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी दिलीप ग्वालवंशी हा ‘एमपीडीए’ अन्वये सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे.
चेन स्नॅचिंग
मोटारसायकलवर आलेल्या लुटारूंनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. पावनभूमीत सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारुती तुकाराम बोकाडे हे पत्नी सुनीतासह मारुती कारमधून बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर सुनीता घराचे फाटक उघडत असताना सीबीझेड मोटारसायकलवर (सीबीझेड ६८६६) दोघे आले. त्या दोघांनी सुनीता यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (किं. ९० हजार रुपये) खेचून पळून गेले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला.