खरेदी खतांची फेरफार नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील ग्रामपंचायत कार्यालयात १ जून २०१३ रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बुलढाणा शहरातील इंदिरानगर येथील शाहिन परवीन नथ्थेखान (२५) सिंदखेड लपाली येथे तलाठी आहे. या गावात तलाठी कार्यालय नसल्यामुळे त्या ग्रामपंचायत कार्यालयात बसून तलाठय़ाचे काम करतात. काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण तायडे यांनी या महिला तलाठय़ाकडे खरेदी खताची फेरफार नोंद घेऊन सातबारा देण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी अडीच हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. त्यावर तायडे यांनी २४ जूनला सरळ बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता या तलाठय़ाने दोन हजार रुपयात काम करून देतो, असे सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी २६ व २८ जून, असे दोन दिवस ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचला. दोन्ही दिवस तलाठी खान या कार्यालयात सापडल्या नाहीत. त्यानंतर १ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुन्हा तलाठी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारकर्ते ज्ञानेश्वर तायडे यांच्याकडून फेरफार व सातबारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना या महिला तलाठय़ास पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या तक्रारीवरून येथील पोलिस ठाण्यात या तलाठय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलिस अधीक्षक आर.एस.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एस.एल.मुंढे, पोलिस जमादार शेख मोबीन, सतीश ढोकणे, शैलेंद्रसिंग ठाकूर, चैतन्य बाळसराफ, महेंद्र चोपडे, सुखदेव ठाकरे, राधेश्याम वैष्णव, निलेश सोळंके, सुनील राऊत, मनोज राजनकर, संतोष यादव, शेख जावेद व महिला पोलिस कर्मचारी वाघ यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे करीत आहेत.

Story img Loader