वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत सुळशी घाटात मोटार चालकाचा खून करून त्याला दरीत टाकणाऱ्या व त्याची गाडी वाईजवळ सटालेवाडी येथे बेवारस सोडून देणाऱ्यास सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी दिली. या वेळी सीताराम मोरे उपस्थित होते.
किशोर मोहन शिंदे (२०, रा. वेळे कामठी (ता. सातारा) असे मृत चालकाचे नाव आहे. तो ही मोटार भाडय़ाने घेऊन गेला होता.  ५ मार्च रोजी सुळशी घाटात त्याच्यावर वार करून त्याचा खून करून मृतदेह तेथेच टाकून त्याच्याकडील तीनशे रुपये, मोबाईल घेऊन गाडी सटालेवाडी (ता. वाई) येथे बेवारस सोडून दिली होती. व तेथेच चालकाचा मोबाईल टाकून दिला होता. गाडीत रक्ताचे डाग होते.
या प्रकरणात कोणताही धागादोरा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सीताराम मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेंदूरजणे (ता. वाई) येथील शिवाजी शंकर चव्हाण या तृतीय पंथीयास ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. चव्हाण हा ओळखीच्या इसमाला गाडीत घेऊन गाडय़ा भाडय़ाने घेऊन फिरत असे. रस्त्यात मध्येच लघुशंकेचे कारण सांगून गाडी थांबवायला सांगे व शरीर सुखाची मागणी करे. नकार दिल्यास वार करून सोडून देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सीताराम मोरे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे शेंदूरजणे येथे सापळा रचून व पाळत ठेवून शिवाजी चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली असून अल्पवयीन साथीदाराचीही माहिती दिली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत भुईज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा