सराफाकडे कारागिरी करताना विश्वास संपादन करून दागिने बनविण्यासाठी घेतलेले ८२ ग्रॅम सोने परस्पर लंपास करून सराफाचा विश्वासघात करणाऱ्या बंगाली कारागिराला सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन पकडले. त्याच्याकडून दोन लाख ६६०० रुपये किंमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
रबिऊल मोहसीन मीर (वय ३०, रा. बेऊरग्राम, जि, हुगळी, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराचे नाव आहे. सोलापूरच्या पूर्व मंगळवार पेठेत नासीर रशीद शेख यांचे सराफीचे दुकान आहे. शेख हे सोन्याचे दागिने तयार करून देतात. त्यांच्याकडे रबिऊल मोहसीन मीर हा बंगाली कारागिर कामाला होता. शेख यांच्याकडे सोने-चांदीचे व्यापारी सिध्दू शिंगारे यांनी दागिने तयार करण्यासाठी ८२ ग्रॅम २५० मिली सोने दिले होते. हे सोने शेख यांनी कारागिर मीर यास कानातील टॉप्स बनविण्यासाठी दिले होते. त्याप्रमाणे त्यांने २५ जोड कानातील टॉप्स बनविले होते. हे टॉप्स परत न करता शेख यांचा विश्वासघात करून मीर याने २४ सप्टेंबर २०१२ रोजी पलायन केले होते. त्याबद्दल जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात मीर याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्य़ाचा तपास करीत जोडभावी पेठ पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये मीर याच्या गावात धडक मारली असता तो सापडला. त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरख कुंभार, पोलीस नाईक अस्लम शेख, बाळासाहेब पालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा