इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात एड्सग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या एआरटी केंद्राचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, माजी आमदार अशोक जांभळे, आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्राद्वारे एड्सबाधित (एचआयव्ही) रुग्णांना औषधे व आवश्यक त्या सर्व चाचण्या, सल्ला आणि मार्गदर्शन मोफत मिळणार आहे. केंद्रासाठी ७ जणांचा स्टाफ शासनाकडून पुरविण्यात आला असून त्यासाठी साडेचार लाखांचे अनुदान महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटीमार्फत मंजूर झाले आहे. एड्सग्रस्तांबरोबरच टीबी रुग्णांवरील उपचारासाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आयजीएम हॉस्पिटलमध्ये नवीन टीबी युनिट मंजूर करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, आयजीएम रुग्णालयाचे प्रभारी डॉ. संगेवार, डॉ. महाजन, डॉ. विवेकानंद पाटील, प्रशासनाधिकारी वीरकर, उपसंचालक डॉ. आर. व्ही. मुगडे, डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बसरे, दीपा शिपुरकर आदी उपस्थित होते. एआरटी केंद्राचे डॉ. विलासराव यादव यांनी आभार मानले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा