गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील कलावंत एकत्र येऊन ‘कोल्हापूर आर्ट फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापुरातील स्थानिक कलावंतांना आपल्या कलावृत्तींना व्यासपीठ मिळवून देऊन कलावंतांना आर्थिक बळ मिळवून देण्याच्या दृष्टीने येत्या डिसेंबर महिन्यामध्ये ‘कोल्हापूर कलामहोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.     
या कलामहोत्सवातील संपूर्ण कार्यक्रमाची माहितीपुस्तिका व बोधचिन्ह (लोगो) याचा उद्घाटन समारंभ १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३५ वाजता कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृतिशिल्प, खरी कॉर्नर येथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते व मान्यवर कलाकार, कलारसिक यांच्या उपस्थित संपन्न होईल. कोल्हापूर कलामहोत्सवातील सहभागासाठी कलावंतांनी श्री. डी. डी.पाटील, जनसंपर्क अधिकारी, अजिंक्यतारा कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे    या महोत्सवात कोल्हापुरातील सध्याचे दिवंगत मान्यवर चित्रकार, ज्येष्ठ चित्रकार, कला शाखेतील विद्यार्थिचित्रकार, शिल्पकार, हस्त कारागीर, छायाचित्रकार, शालेय विद्यार्थी यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन असेल. त्याचबरोबर कलावंतांच्या कलाकृतींच्या विक्रीची व्यवस्था भव्य मंडपात विविध आकारातील स्टॉलमध्ये करण्यात येणार आहे.     
या कलामहोत्सवासाठी छत्रपती शाहू स्मारक भवन व त्या शेजारील दसरा चौक मैदान या जागेची निवड केली आहे. त्याच प्रमाणे कलामहोत्सवात कलावंतांना सहभागी करून घेण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. विजेत्या कलावंतांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कलामहोत्सवातील स्पर्धेमध्ये इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्र व शिल्प या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चित्र स्पर्धेसाठी २ बाय २ फूट आकारात आवडीचा विषय आणि शैलीवर कोणत्याही माध्यमात चित्रकृती योग्य फ्रेमसह व शिल्प स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ फूट उंचीचे व टिकाऊ माध्यमात शिल्पकृती तयार करायची आहे. या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इतर मान्यवर चित्रकारांसाठी याच पद्धतीने चित्र आणि शिल्पकृती तयार करायची आहे.     
या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी व चित्रकार यांनी आपल्या कलाकृतीचा फोटो, पूर्वीच्या कलाकृतींची सीडी, फोटोसहित बायोडेटाचा प्रवेशअर्जासह व स्टॉलमध्ये विक्रीसाठी कलाकृती ठेवण्यासाठी विहित नमुन्यातील प्रवेशअर्ज १५ नोव्हेंबपर्यंत आयोजकांकडे देणे आहेत. या प्रदर्शनाबरोबरच कलामहोत्सवात कलाविषयक व्याख्यान, संवाद, फिल्म शो, स्लाइड शो, चित्र, शिल्प, हस्तकला प्रात्यक्षिके यांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी सूचना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Story img Loader