अक्षय्यतृतीयेनंतर आंब्याची चव खुलते असे म्हणतात. पण बाजारात आंबे खरेदीसाठी जाणार असाल, तर जरा सावध खरेदी करा! कारण तुम्ही घेणार असलेला आंबा कृत्रिमरीत्या पिकविलेला असू शकतो. शहरातील मोंढा भागात कृत्रिम आंबे पिकविले जात असल्याचे समजताच अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकून तब्बल दीड हजार क्विंटल आंबे जप्त केले. नारेगाव येथे हे सर्व आंबे बुलडोझर फिरवून नष्टही करण्यात आले.
सुटीच्या दिवशी आमरस-पुरीचा बेत करून तो रग्गड चाखावा, असे ठरविले असेल तर आंब्याची खरेदी जरा सावधपणेच करायला हवी. कारण कार्बाईडने पिकविलेला आंबा शरीरास घातक ठरू शकतो. या रासायनिक पदार्थामुळे २४ तासांत हिरवे आंबे पिकतात खरे. मात्र, ते खाल्ल्यास संसर्ग होऊ शकतो. घसा, फुफ्फुसावर त्याचे परिणाम जाणवतात. अतिसेवनाने कर्करोगसुद्धा होऊ शकतो, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले. कृत्रिमरीत्या आंबे पिकवून अधिक नफा कमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी सकाळी कारवाई करण्यात आली. सध्या आंब्याचे दर मध्यमवर्गीयांना तसे परवडणारे नाहीत. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा ‘हापूस’ म्हणून वाटेल त्या किमतीत ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. दुपटी-तिपटीत दर सांगायचा नि प्रत्यक्षात चढय़ा भावाने विक्री होत असल्याने कृत्रिमरीत्या आंबा पिकविला जात आहे.

Story img Loader