एक हंगाम संपला की दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू होते. त्या त्या हंगामातील कामेही वेगवेगळी असतात, असीच काहीची स्थिती झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांची आहे. सहा महिने झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणारा कलावंत आता शेतीच्या कामाला लागला आहे.
झाडीपट्टी रंगभूमीचा हंगाम भाऊबीज ते शिमगा असा सहा महिन्यांचा असतो. हा हंगाम संपल्यानंतर ही कलावंत मंडळी त्यांची मूळ व्यावसायिक कामे करीत असतात. यातील बहुंताश कलावंत शेतात राबणारे आहेत. आता शेतीचा खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने हे कलावंत शेतात काम करू लागले आहेत. काही कलावंत टेलरिंगची कामे करीत आहेत. रंगभूमीवरील कामानंतर हे कलावंत त्यांच्या कामात गुंतलेले असतात, असे झाडीपट्टीवरील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नरेश गडेकर यांनी सांगितले.
आता पावसाळा सुरू असल्याने नाटकांच्या तालिमी बंद आहेत. शिमग्याला झाडीपट्टी रंगभूमीचा हंगाम संपल्यानंतर कलावंत त्यांच्या मूळ गावी जावून शेती, मजुरी, व्यवसाय करीत आहेत. दिवाळीपासून पुन्हा रंगभूमीवर नाटय़ सादर करण्यासाठी त्या त्या संस्थेत हे कलावंत जातात, असे ज्येष्ठ कलावंत शेखर डोंगरे यांनी सांगितले.
झाडीपट्टी रंगभूमीवर भाऊबीजेपासून नाटकांची रेलचेल असते. झाडीपट्टीत मंडई, गावागावांमध्ये देवीची यात्रा भरते. यानिमित्ताने वेगवेगळ्या गावांतील लोक येतात. झाडीपट्टीवरील नाटय़ संस्थांमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील कलावंत असतात. गडचिरोली, नवरगाव, सिंदेवाही, नागपूर आणि इतर ठिकाणच्या नाटय़ संस्था रसिकांच्या मनोरंजासाठी राबत आहेत. नाटकांमध्ये स्थानिक कलावंतांचा मोठा सहभाग असतो. हे कलावंत झाडीपट्टी रंगभूमी हंगाम संपल्यानंतर इतर कामे करतात. या काळात काही कलावंत नाटक लिहीतात आणि ती स्क्रीप्ट इतर कलावंतांकडे पोहोचवितात. पुढील हंगामासाठी काही नवीन नाटकांची तयारी अशा काळात सुरू असते. नाटय़ संस्था, निर्माते हे कलावंतांच्या संपर्कात असतात आणि कोणी आपल्या संस्थेतून बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेत असतात. या रंगभूमीवर कलावंताची पूर्णपणे गुजराण होऊ शकत नाही. हा काही ठोस उत्पन्नाचा व्यवसाय नाही, याला काही मर्यादा आहेत, पण या रंगभूमीवरील रसिकांचा उत्साह कायम आहे. रसिकांनीच ही रंगभूमी उचलून धरली आहे, म्हणून नाटक टिकून आहे, असे ज्येष्ठ कलावंत देवेंद्र लुटे यांनी सांगितले. सध्या नांदी या नाटय़ाची तालीम सुरू असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी हिरालाल पेंटर म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा