तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित राम मराठे स्मृती द्विराज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत नगर येथील अरूण आहेर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र आणि गोवा अशा दोन राज्यांच्या पातळीवर गेल्या २८ वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येते. त्यात कंठसंगीत, तंतूवादन, संवादिनी वादन, तबला, पखवाज, एकल वादन, नाटय़संगीत, मराठी सुगम संगीत अशा विविध वाद्य व गायन प्रकारांची वयानुसार विभागणी केली जाते. नगरसह गोव्यातील १८ उपकेंद्रांवर दि. २३ ते २५ दरम्यान या स्पर्धेची पहिली फेरी झाली. त्यातून अंतिम फेरीसाठी प्रत्येकी एकाची निवड करण्यात येते. नगर उपकेंद्रावरून अरूण आहेर यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. इतर १७ स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या इतिहासात नगरला प्रथमच हा बहुमान मिळाला.
संगीत क्षेत्रातील दिग्गज शेखर कुंभोजकर, अर्चना कान्हेरे, गिरीष जोशी, मुकुंद उपासनी, लता गोडसे (सर्व पुणे) आणि विश्वनाथ ओक (औरंगाबाद) यांनी अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. आहेर यांना डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, श्रीराम तांबोळी, डॉ. गोपाळराव मिरीकर, जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. माजी आमदार दादा कळमकर, नगरसेवक गणेश कवडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा